जिल्हाधिकारी कार्यालयावर "क्रांतिकारी"‘ चा हल्लाबोल! अभी तो ट्रेलर है… महाराष्ट्रातील सगळ्या मोर्चांचे रेकॉर्ड मोडणारा मोर्चा काढणार!’

 रविकांत तुपकरांचा सरकारला इशारा; हेक्टरी १ लाख मदत, सरसकट कर्जमाफीची मागणी, दुष्काळी जीआरच्या प्रती फाडल्या! म्हणाले,आमदार–खासदारांचे पगार थांबवा, पण शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करा
 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : “सरकारची आश्वासने फालतू आणि तकलादू आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी असे फालतू जीआर काढू नका. अभी तो ट्रेलर है… महाराष्ट्रातील सगळ्या मोर्चांचे रेकॉर्ड मोडणारा मोर्चा काढणार!” अशा आक्रमक शब्दांत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर यांनी सरकारला इशारा दिला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई, सरसकट कर्जमाफी आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांची मदत मिळावी, या मागण्यांसाठी आज, २८ सप्टेंबर रोजी राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. बुलढाण्यात रविकांत तुपकर यांच्या उपस्थितीत झालेल्या हल्लाबोल आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली.

दुष्काळी जीआरच्या प्रती फाडल्या; ‘शेतकऱ्यांना कोणताही दिलासा मिळणार नाही!’

राज्य सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळी जीआरवर तुपकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला. सरकारचा हा जीआर अतिशय तकलादू असून, त्यातून शेतकऱ्यांना कोणताही ठोस दिलासा मिळणार नाही, अशी टीका त्यांनी केली. यावेळी शासनाच्या दुष्काळी जीआरच्या प्रती फाडून निषेध नोंदवण्यात आला. “शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीनच्या उत्पादनासाठी हेक्टरी एक लाख रुपयांपर्यंत खर्च झाला आहे. त्यामुळे हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे,” अशी मागणी तुपकर यांनी केली.

 ‘पंचनाम्याचे नाटक नको, नुकसान डोळ्यांसमोर दिसतेय!’

शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या प्रक्रियेवरही आंदोलनातून प्रश्न उपस्थित करण्यात आले. शेतकऱ्यांचे नुकसान स्पष्टपणे दिसत असताना पंचनाम्यांच्या नावाखाली वेळकाढूपणा करू नये, अशी भूमिका मांडण्यात आली. मुख्यमंत्री स्वतः शेताच्या बांधावर येऊन पाहणी करून गेले आहेत, त्यामुळे आता प्रत्यक्ष निर्णय घेऊन शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी एक लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

 सरसकट कर्जमाफी, नियमित कर्जदारांना २ लाख रुपये द्या!

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांची प्रोत्साहनपर मदत द्यावी आणि शेतकऱ्यांना नव्याने पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, अशा मागण्या तुपकर यांनी केल्या. केवळ आश्वासने देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी ठोस आर्थिक मदत आणि कर्जमाफीची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 ‘मोठे प्रकल्प थांबवा, आमदार-खासदारांचे पगारही थांबवा!’

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने आपल्या खर्चाच्या प्राधान्यक्रमात बदल करावा, अशी मागणी तुपकर यांनी केली. राज्यातील मोठे प्रकल्प काही काळ थांबवून त्यासाठीचा निधी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वळवावा. आमदार, खासदार आणि इतर लोकप्रतिनिधींचे पगार थांबवून हा पैसा शेतकऱ्यांसाठी वापरावा, अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली. शक्तिपीठ महामार्गासाठी प्रस्तावित निधीही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वळवण्याची मागणी करण्यात आली.

३० सप्टेंबरला हिंगोलीत मोर्चा; राज्यव्यापी मोठ्या आंदोलनाची घोषणा होणार!

आजचे आंदोलन हा केवळ ट्रेलर असल्याचे सांगत रविकांत तुपकर यांनी पुढील आंदोलनाची घोषणा केली. ३० सप्टेंबर रोजी हिंगोली येथे भव्य मोर्चा काढण्यात येणार असून, या मोर्चातून महाराष्ट्रव्यापी मोठ्या आंदोलनाची घोषणा करण्यात येणार असल्याचे तुपकर यांनी सांगितले. “महाराष्ट्रातील सगळ्या मोर्चांचे रेकॉर्ड मोडणारा मोर्चा काढणार,” असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.दरम्यान रविकांत तुपकर माध्यमांशी संवाद साधत असतांनाच बुलडाणा पोलिसांनी बळाचा वापर करून रविकांत तुपकरांसह आंदोलकांना ताब्यात घेतले. सध्या तुपकरांना बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात स्थानबद्ध करण्यात आले आहे..