खडकपूर्णा प्रकल्प 'ओव्हर फ्लो'; दोन दरवाजे उघडले;
नदीकाठावरील ३३ गावांना सतर्कतेचा इशारा!

 
 देऊळगाव मही (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात माेठा प्रकल्प असलेल्या खडकपूर्णा प्रकल्प ओव्हर फ्लाे झाला असून प्रकल्पाच्या दाेन गेटमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे, खडकपूर्णा नदीच्या काठावर असलेल्या ३३ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 
जिल्ह्यात सिंचनासह पाणीपुरवठा याेजनेसाठी महत्वाचे असलेल्या संत चाेखासागर प्रकल्पाच्या क्षेत्रात जाेरदार पाउस झाला आहे. त्यामुळे, प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. सध्या प्रकल्प ८५ टक्के भरला आहे.या प्रकल्पाचा प्रकल्पीय संचयीत साठा ९३.४० दलघमी आहे व पूर्ण संचय पातळी ५२०.५० मीटर आहे. प्रकल्पात सद्यस्थितीत ५२९ मीटर जलाशय पातळी असून ७९.८६ दलघमी पाणीसाठा आहे. त्यामुळे प्रकल्पाचे पाणी प्रकल्प शेजारील गावात शिरू शकते, त्यामुळे दोन दरवाजे पाच सेंटीमीटरने उघडण्यात आले असून नदीपात्रात पाणी सोडले आहे. प्रकल्पाच्या क्षेत्रात आणखी पाउस झाल्यास प्रकल्पातून विसर्ग वाढवण्यात येणार आहे. 
जिल्ह्यातील या गावांना दिला सतर्कतेचा इशारा 
नदीकाठावरील गावापैकी देऊळगाव राजा तालुक्यातील निमगाव गुरू, सावंगी टेकाळे, डिग्रस बुद्रुक, डिग्रस खुर्द, टाकरखेड वायाळ, टाकरखेड भागिले, सिंदखेड राजा तालुक्यातील निमगाव वायाळ, साठेगाव, हिवरखेड, राहेरी खुर्द, तडेगाव, राहेरी बुद्रुक, ताडशिवणी, देवखेड, पिंपळगाव कुंडा, लिंगा आणि लोणार तालुक्यातील खापरखेडा, रायगाव व सावरगाव तेली गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, असे प्रकल्प सहाय्यक अभियंता एस. जे. तेल्हार, पुरुषोत्तम भागिले यांनी कळविले आहे.