"कर्मभूमी ते गुरुभूमी" पायी वारी सोहळा उत्साहात..!
नामस्मरणामध्ये जीवनाचे सार्थक करा :- समर्थ सद्गुरू श्रीहरी महाराज
Jul 16, 2024, 21:06 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) नामस्मरणाने चित्त शुद्धी होते. प्रापंचिक जीवनामध्ये भगवंताच्या कथा, लिलावर्णन ऐकावे. त्याहीपेक्षा अगदी केव्हाही कुठेही घेता येईल असे नाम जीवापाड जपावे. संतांनी ईश्वर प्राप्तीसाठी नामस्मरणाचा मार्ग अनुभवातून सांगितला आहे. नाम हे साधन श्रेष्ठ आहे. आपल्या गुरुने सांगितलेले साधन निष्ठेने पाळून नामस्मरणामध्ये जीवनाचे सार्थक करा असे मौलिक मार्गदर्शन समर्थ सद्गुरु श्रीहरी महाराज (श्रीक्षेत्र माकोडी ) यांनी केले. चैतन्य मंदिर परिसरात भाविकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
राम नामाच्या प्रचार आणि प्रसारासाठी आपल संपुर्ण आयुष्य खर्ची घालत असलेले समर्थ सद्गुरु श्री. श्रीहरी महाराज (माकोडी) यांच्या वाढदिवसानिमित्त "कर्मभूमी ते गुरुभुमी" अर्थात बुलढाणा ते श्रीक्षेत्र माकोडी पायीवारी सोहळा भाविकांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. १३ जुलै रोजी सकाळी शहरातील मलकापूर रोडवरील गणेश नगरस्थित साईराम मंदिर येथून या पायीवारीला सुरुवात झाली. १३ ला राजूर मार्गे वाघजाळफाटा, मोताळा येथे वारी पोहचेली. मोताळा येथे शेजोळ कुटुंबीयांकडे सायंकाळ उपासना झाल्यानंतर मुक्काम स्थळी विसावा झाला. दुसऱ्या दिवशी १४ जुलैला डिडोळाफाटा ते शेलापूर मार्गे सायंकाळ दरम्यान वारीने श्रीक्षेत्र मुक्काम गाठला. दरम्यान शेलापुर येथे अकोला, खामगाव आणि परिसरातून आलेल्या इतर पायी दिंड्या त्यात सहभागी झाल्याने राम नामाचा जयघोष आणि भजनानंद घेत पावसाच्या सरींमध्ये भाविक तल्लीन झाले होते.
आषाढ शुद्ध नवमीला १५ जुलै रोजी नित्यनेमाप्रमाणे काकड आरती झाल्यानंतर समर्थ सद्गुरु श्रीहरी महाराज यांचे मंगल स्नान व पाद्यपूजन मंत्रोच्चारामध्ये करण्यात आले. जानेफळ येथील डॉक्टर दिवटे कुटुंबीय व डोणगाव येथील आखाडे कुटुंबीयांच्या वतीने महाराजांची साखर तुला करण्यात आली. दरम्यान श्रीहरी महाराजांनी जमलेल्या भाविकांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, भगवंत भेटीची खरी तळमळ लागली पाहिजे. प्रापंचिक सुखासाठीच सर्वांचा आटाकाटा सुरू आहे. संत भेटीसाठी तुम्हाला फार काही करावे लागत नाही.
तुम्ही ईश्वराच्या नामस्मरणाचा , रामनामाचा ध्यास घ्या. संतच तुम्हाला धुंडाळीत येतील एवढी ताकद ईश्वराच्या नामामध्ये आहे. शुद्ध भावनेने, निरपेक्ष भक्ती केली की नक्कीच सद्गुरु आणि भगवंत कृपा करतात. फक्त देव आणि नाम हे एकच आहेत, हे मानून आपण नामस्मरण नित्यनेमाने करावे असे श्रीहरी महाराज म्हणाले. दुपारी महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली. वारी सोहळ्या साठी पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त बजावला.