केवळ फलक काढले, धोकादायक होर्डिंग्जचे लोखंडी खांब काढायला मुहूर्त मिळेना! नगर प्रशासनाचे दुर्लक्ष की राजकीय दबाव? काही कळेना..

 
बुलडाणा(अभिषेक वरपे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) मुंबई- घाटकोपर होर्डिंग्स दुर्घटनेत १७ निष्पाप जीवांचा बळी गेल्याची घटना होवून ८ दिवस उलटले आहेत. या दुर्घटनेनंतर तात्काळ मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील सगळ्या होर्डिंग्सचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याचे आदेश दिले. याबाबत शासनाने जिल्हास्तरावर आदेश निर्गमित केले असून नगर प्रशासन, नगरपंचायत, तहसील विभाग यांना पत्र पाठविण्यात आले. त्या अनुषंगाने बुलढाणा शहरात नगरपरिषदेने अनधिकृत होर्डिंग्स काढण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. शहरातील बहुतांश होर्डिंग्सवरील फलक (बॅनर आणि फ्रेम) हटविण्यात आले असले तरी मूळ धोकादायक असलेले अवाढव्य खांब अजूनही जैसे थे आहे! शहरातील सर्क्युलर रोडवरील फलक काढून ६ दिवस उलटले आहे तरी धोकादायक होर्डिंग्सचे खांब काढायला नगर पालिकेला मुहूर्त मिळाला नाही. 
शहरात जवळपास ५० पेक्षा जास्त धोकादायक होर्डिंग्स असल्याचा अंदाज आहे. होर्डिंग्साठी उभारण्यात असलेले भले मोठे खांब नियमात बसतात का? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे शहरील बहुतांश होर्डिंग्स अनअधिकृत असतील असाही प्राथमिक अंदाज आहे.
याआधी बुलढाण्यातही घडली होती होर्डिंग दुर्घटना! 
याआधी सुद्धा जाहिरात होर्डिंग पडण्याची मोठी दुर्घटना बुलढाणा शहरातील संगम चौक नजीक चवरे मार्केटमध्ये घडली होती. दिवाळी सणाच्या दरम्यान शंभर फुटाच्या उंचीवरील ४० बाय ४० चे भव्य जाहिरात होर्डिंग जमिनीवर कोसळले होते. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नव्हती. 
नगरपालिकेचे दुर्लक्ष की दबाव ?
२० फुटावरील उंचीचे होर्डिंग अनधिकृत ठरते. त्यामुळे अश्या अनधिकृत होर्डिंगवर कारवाई झाली पाहिजे. संबधीत कंत्राटदारांना कायमची परवानगी नाकारली पाहिजेत. शिवाय अनधिकृत होर्डिंगसाठी कुणी राजाश्रय देतोय का? हे देखील तपासणे आवश्यक आहे. पूर्णतः होर्डिंग उखडण्यास वेळ लागत असेल तर नगरपालिकेचे दुर्लक्ष म्हणावे की कुणाचा दबाव? अशी शंका सुद्धा निर्माण झाली आहे. असे मत आझाद हिंद संघटनेचे संस्थापक सतीशचंद्र रोठे यांनी व्यक्त केले.