नुकसानग्रस्त भागाची सह पालकमंत्री सावकारे यांनी केली पाहणी; तातडीने पंचनामे करून मदत देण्याचे दिले आदेश..!

 
 मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : परिसरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना सानुग्रह निधीतून मदत द्यावी, असे स्पष्ट निर्देश बुलढाणा जिल्ह्याचे सह-पालकमंत्री तथा राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री नामदार संजय सावकारे यांनी अधिकाऱ्यांना दिले.
१७ सप्टेंबर रोजी ना. सावकारे यांनी मलकापूर तालुक्यातील विवरा, भानगुरा, दसरखेड आदी भागांचा दौरा करून शेतकऱ्यांच्या परिस्थितीची पाहणी केली. या वेळी आमदार चैनसुख संचेती, तहसीलदार राहुल तायडे, उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे, तालुका कृषी अधिकारी ललित सूर्यवंशी यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पावसामुळे सोयाबीन, कापूस, मका आदी पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या जनावरांचे आणि घरांचेही नुकसान झाले आहे. याबाबत पंचनामे करून तातडीने मदत देण्यात यावी, असे ना. सावकारे यांनी स्पष्ट केले. तहसीलदार तायडे यांनी तालुक्यात ७११ घरांचे नुकसान, एक म्हैस, एक बैल व दोन बकऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली.
आमदार चैनसुख संचेती यांनीही मलकापूर मतदारसंघात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले असून, शासनाकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.