जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वाखाली मासरूळ सर्कल जिल्ह्यात अव्वल :जयश्री शेळके; धामणगाव धाड येथे पार पडली मासरूळ जिल्हा परिषद शिवसेना ( उबाठा) पदाधिकाऱ्यांची बैठक...

 
 धामणगाव धाड (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मासरूळ जिल्हा परिषदेचा विकास पॅटर्न बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक प्रगत असून, त्यामागे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वाचा मोलाचा वाटा आहे. “त्यांच्या स्वभावाची खासियत अशी आहे की, त्यांच्याशी एकदा जोडलेला माणूस कधीच तुटत नाही. जिव्हाळ्याची नाळ कायम राखणारा हा नेता आहे,” असे प्रतिपादन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या राज्य प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांनी केले.
धामणगाव धाड येथे मासरूळ जिल्हा परिषद सर्कलच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शनिवारी (१२ ऑक्टोबर) पार पडली. शेती हंगामाची धावपळ सुरू असूनही कार्यकर्त्यांनी जालिंदर बुधवत यांच्यावरील प्रेम आणि निष्ठेपोटी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या बैठकीचे रूपांतर मेळाव्यात झाले.
या मेळाव्याला शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, आमदार सिद्धार्थ खरात, राज्य प्रवक्त्या जयश्रीताई शेळके, डी. एस. लहाने सर, सुमित सरदार, युवा शिवसेना जिल्हाप्रमुख नंदू कऱ्हाडे, उपजिल्हाप्रमुख लखन गाडेकर, तालुकाप्रमुख विजय इतवारे, तसेच अनिल नरोटे, अशोक गव्हाणे, डॉ. अरुण पोफळे, गजानन उबरहंडे, सुनील गवते, दिलीप सिनकर, हरिभाऊ सिनकर, एकनाथ कोरडे, संजय गवळी, गणेश पालकर यांच्यासह सरपंच, उपसरपंच आणि प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“निष्ठेचा वारकरी म्हणजे जालिंदर बुधवत” — जयश्री शेळके
या वेळी जयश्री शेळके म्हणाल्या, “अमिषांना बळी पडून अनेक जण गद्दार झाले, पण जालिंदर बुधवत यांनी उद्धव ठाकरे साहेब आणि मातोश्रीवरील निष्ठा कधीच सोडली नाही. त्यांनी गावोगावी जाऊन मशाल पेटवली, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मोर्चे काढले, आणि विकासाचा नवा आराखडा तयार केला. त्यांच्या मतदारसंघातील प्रत्येक गावात त्यांनी विकासकामांची अमिट छाप सोडली आहे.”
त्या पुढे म्हणाल्या, “शाळा खोल्या, आरोग्य सुविधा, रस्ते, तीर्थक्षेत्र विकास अशा असंख्य कामांनी मासरूळ सर्कलचा चेहरामोहरा बदलला. पक्षाने कोणताही उमेदवार दिला तरी त्याला निवडून आणण्यासाठी बुधवत सर्वात पुढे असतात. दोन वेळा मतदारसंघ राखीव असतानाही त्यांनी उमेदवारांना विजयी करून दाखवले.”
“कोरोना संकटकाळात सौ. कमलताई बुधवत यांनी शिक्षण व आरोग्य सभापती म्हणून केलेले काम आणि उपाध्यक्ष म्हणून घेतलेले निर्णय हे दूरगामी परिणाम करणारे ठरले. माणसावर आणि कार्यकर्त्यावर असलेली मायेची पकड हीच त्यांची खरी ताकद आहे. पुन्हा एकदा या बालेकिल्ल्यावर भगवा फडकवायचा आहे,” असेही शेळके म्हणाल्या.सूत्रसंचालन गजानन धांडे यांनी केले.
“निवडणूक कार्यकर्तेच लढवतात” — जालिंदर बुधवत
या वेळी जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत म्हणाले, “मासरूळ जिल्हा परिषद मतदारसंघात कोणतीही निवडणूक असो, येथील निष्ठावंत शिवसैनिक आणि पदाधिकारी स्वतः ती हाती घेतात. आम्ही निष्ठेचे वारकरी आहोत; पक्ष जो उमेदवार देईल, त्याला विजयी करण्याची जबाबदारी आमचीच आहे.” “सर्कलनिहाय आरक्षण जाहीर व्हायला एक दिवस बाकी आहे. आरक्षणानंतर बैठक घेण्यापेक्षा आधीच पक्षाची ताकद दाखवून देण्याचा निर्धार आम्ही केला आहे. कोणतेही आरक्षण असो, मासरूळ सर्कलमधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचाच उमेदवार विजयी होईल आणि मशाल पुन्हा पेटेल,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.