“जागर नारीशक्तीचा, सन्मान कर्तृत्वाचा” – चिखलीत गौरव सोहळा! आमदार श्वेताताईंनी केला कर्तृत्वान नारीशक्तीचा गौरव.... 

 
 चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): स्त्री ही केवळ घराच्या चौकटीपुरती मर्यादित नसून तिच्या कर्तृत्वाने ती संपूर्ण समाजाला दिशा देऊ शकते, हे वास्तव पुन्हा अधोरेखित झाले. चिखली येथील श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था सभागृहात “जागर नारीशक्तीचा, सन्मान कर्तृत्वाचा” पुरस्कार वितरण सोहळा दणदणीत उत्साहात पार पडला. समाजातील विविध क्षेत्रांत आपली वेगळी छाप सोडणाऱ्या आणि कार्यातून प्रेरणा देणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा यावेळी आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला...

या वेळी आमदार सौ. श्वेता महाले पाटील म्हणाल्या,
“नारी ही शक्ती, श्रद्धा आणि प्रेरणेचा स्रोत आहे. समाजातील प्रत्येक क्षेत्रात महिलांनी केलेले योगदान स्तुत्य आहे. आज गौरविल्या जाणाऱ्या सर्व महिलांनी आपल्या कर्तृत्वाने अनेकांसाठी आदर्श निर्माण केला आहे. त्यांचा हा सन्मान म्हणजे प्रत्यक्षात समाजातील प्रत्येक कर्तबगार स्त्रीच्या जिद्दीचा आणि प्रयत्नांचा सन्मान आहे.”हा सोहळा म्हणजे केवळ पुरस्कारांचे वितरण नव्हे तर तो स्त्री शक्तिच्या कर्तृत्वाला दिलेला दणदणीत सलाम, नारीशक्तीला मिळालेली सामूहिक मान्यता आणि भावी पिढीला दिलेली प्रेरणा आहे.

पुरस्कारप्राप्त सत्कारमूर्तींमध्ये उद्योग, सामाजिक कार्य, शिक्षण, सहकार, गृहउद्योग, अवधान व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश होता. शारदाताई सुनील वायाळ, द्वारकाताई विष्णू काळे, मीराताई सोनुने, लिलावती भगत, आशिया बी पठाण, समिद्राबाई काशिनाथ वाघ, रुक्मिना सोळंकी, नलिनी राजेंद्र गोरे, सारिका दिलीप विभुते, कविता लक्ष्मण चोथे, सुमन भास्कर खडोळ यांचा  गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये आधार बहुउद्देशीय शिक्षण संस्था, तोरणा अर्बन परिवार, देवाभाऊ लाडकी बहीण पतसंस्था यांचा मोलाचा सहभाग होता.