दुपारचे पावणेबारा वाजले... पालकमंत्र्यांचा दरवाजा उघडेना! दुष्काळ पाहणीच्या दौऱ्याआधीच अधिकारी ‘वेटिंग’वर; जिल्हाधिकारी येऊन परतले!
सकाळी साडेनऊ-दहाच्या सुमारास जिल्हाधिकारी डॉ.प्रवीणकुमार देवरे विश्रामगृहावर दाखल झाले. पालकमंत्र्यांच्या भेटीसाठी त्यांनी तब्बल तास-दीड तास प्रतीक्षा केल्याचे सांगण्यात आले. पालकमंत्र्यांची तयारी सुरू असल्याने जिल्हाधिकाऱ्यांची त्यांच्या ओएसडीसोबत चर्चा झाली. अखेर साडेअकराच्या सुमारास जिल्हाधिकाऱ्यांनी विश्रामगृह सोडले.
दरम्यान, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, जिल्हा कृषी अधिकारी श्री. डाबरे, उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांच्यासह महसूल आणि कृषी विभागातील अधिकारीही प्रतीक्षेत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तसेच आजी-माजी आमदारही पालकमंत्र्यांच्या भेटीसाठी सकाळपासून विश्रामगृहात थांबले होते.
माजी आमदार सानंदा, ॲड. नाझेर काझींचीही प्रतीक्षा
माजी आमदार सानंदा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांनी पालकमंत्र्यांच्या कक्षाजवळ अनेकदा जाऊन परिस्थितीचा कानोसा घेतला. मात्र बराच वेळ कक्षाचा दरवाजा उघडला नसल्याचे चित्र होते. वृत्त लिहिले जात असताना दुपारी बाराच्या सुमारासही पालकमंत्र्यांच्या भेटीसाठी अधिकारी आणि पदाधिकारी प्रतीक्षेत असल्याचे दिसून आले.
दुष्काळाची पाहणी की वेळेची प्रतीक्षा?
सध्या बुलढाणा जिल्ह्यात दुष्काळाचे संकट गंभीर होत चालले आहे. शेतकऱ्यांच्या हातात करपलेली पिके आहेत, उत्पादनाचे मोठे नुकसान झाले आहे आणि मदतीसाठी शेतकऱ्यांच्या नजरा शासनाकडे लागल्या आहेत.अशा परिस्थितीत जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा दुष्काळ पाहणी दौरा नेमका किती उशिरा सुरू होतो, याला निश्चितच महत्त्व आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाणाऱ्या दौऱ्याच्या आधीच जर अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असेल, तर त्यातून प्रशासनाला नेमका कोणता संदेश जातो, हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेण्यासाठी दौरा करणाऱ्या पालकमंत्र्यांकडूनच वेळेचे आणि परिस्थितीचे गांभीर्य राखले जाणे अपेक्षित आहे.
दुष्काळाच्या संकटात प्रशासनातील प्रत्येक मिनिट महत्त्वाचे असताना “पालकमंत्री कधी भेटणार?” या प्रतीक्षेत अधिकारीच ताटकळत बसल्याचे चित्र निश्चितच चर्चेचा विषय ठरले आहे.आता पालकमंत्री मकरंद पाटील या संपूर्ण प्रकाराबाबत काय स्पष्टीकरण देतात आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांच्या पाहणी दौऱ्यातून नेमके काय निष्पन्न होते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
अपडेट..अखेर ११ वाजून ५६ मिनिटांनी पालकमंत्र्यांच्या कक्षाचा दरवाजा उघडला!.