जगणे मुश्किल झाले हो, सरकार आमच्या खात्यात पीक विमा कधी जमा करणार ? संतप्त शेतकरी वैभव निकस यांचा सवाल!

 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) सरकार शेतकऱ्यांचं, जगणं मान्य तरी करणार आहे का? मागील वर्षी रब्बी हंगामात नेहमीसारखा हरभरा पेरला. पण जे व्हायचं नाही तेच झाले! निसर्गाच्या आले मना, तिथे शेतकऱ्यांचे काय चालेना! होतं नव्हतं सगळा हरभरा जमीनदोस्त झाला.. आता एक वर्ष उलटून गेले तरी पिकविम्याचे पैसे खात्यात जमा झाले नाही. शेतकरी पिक विम्याच्या पैशाची वाट पाहून थकले, पण शासनाने अजून काही पिक विमा जमा केला नाही. यामुळे, मेहकर तालुक्यातील सावत्रा येथील संतप्त शेतकऱ्यांनी आज सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांना निवेदन सुपूर्द केले. प्रलंबित पीकविमा तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा अशी मागणी वैभव निकस यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी केली. 

 मागील वर्षी रब्बी हंगामात पेरलेल्या हरभरा पिकाचे अतोनात नुकसान झाले होते. मेहकर तालुक्यातील सावत्रा आणि सोनार गव्हाण या गावातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत विमा उतरवला. कंपनीच्या नियमाप्रमाणे ७२ तासांच्या आत पीक नुकसानीची तक्रार नोंदविण्यात आली. एग्रीकल्चर एप्लीकेशन, फोन, ई-मेल्स द्वारे ही तक्रार करण्यात आली होती. दरम्यान, तक्रारीची दखल घेवुन कंपनीचे प्रतिनिधी शेतात येऊन गेले.
त्यांनी नुकसानीचा पंचनामा केला. खरीप हंगाम सुरू झालेला असून, रब्बी हंगामातील पिक विम्याची रक्कम अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. कसेबसे कर्ज काढून, पैशांशी जमवाजमा करून शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची पेरणी केली. शासनाने निवेदनाची देखील घेऊन रब्बी हंगामातील पिक विमा रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा अशी मागणी निवेदनातून होत आहे. निवेदनावर, सावत्रा येथील शेतकरी वैभव निकस, अक्षय निकस, सुधाकर निकस, प्रदीप निकस, मयूर निकस, यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.