मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही? बुलढाण्यात SIR अंतर्गत मोठी यादी प्रसिद्ध; मृत, गैरहजर अन् स्थलांतरित मतदारांची नावेही ऑनलाइन!

 
 बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : विशेष सखोल पुनरीक्षणामुळे बुलढाणा जिल्ह्यातील मतदार याद्यांमध्ये मोठी हालचाल सुरू झाली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये 1 ऑक्टोबर 2026 या अर्हता दिनांकावर आधारित विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) राबविण्यात येत असून, या प्रक्रियेअंतर्गत मृत, गैरहजर, कायमस्वरूपी स्थलांतरित तसेच इतर प्रवर्गातील मतदारांची विधानसभा मतदारसंघनिहाय यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या यादीमुळे आता आपले नाव मतदार यादीत आहे का, कोणत्या प्रवर्गात आहे आणि गणनापत्रकाची नोंद झाली आहे का, याची तपासणी नागरिकांना करता येणार आहे.

20 लाख 89 हजार 965 मतदारांचे गणनापत्रक; डिजिटायझेशनची प्रक्रिया सुरू

बुलढाणा जिल्ह्यात SIR अभियानांतर्गत तब्बल 20 लाख 89 हजार 965 मतदारांना गणनापत्रकांचे वाटप करण्यात आले असून, त्यांचे डिजिटायझेशन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील एकही पात्र मतदार मतदारयादीतून वंचित राहू नये, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.

दरम्यान, 11 ऑगस्ट 2026 रोजी भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत ERO Net प्रणालीवरून विविध प्रवर्गातील मतदारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.यामध्ये मृत मतदार (Death), गैरहजर मतदार (Absent), कायमस्वरूपी स्थलांतरित (Permanently Shifted), इतर मतदार (Others) आणि यापूर्वीच मतदार यादीत समाविष्ट असलेले मतदार (Already Enrolled) यांचा समावेश आहे.

एका क्लिकवर पाहता येणार मतदार यादी!

बुलढाणा जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर ही विधानसभा मतदारसंघनिहाय यादी नागरिकांच्या अवलोकनासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आपले तसेच आपल्या कुटुंबातील सदस्यांचे नाव तपासून पाहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

विशेष म्हणजे, संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली मतदार यादी QR Code आणि Google Lensच्या माध्यमातून मोबाईलवरही सहज पाहता येणार आहे.

नाव यादीत चुकीने गेले असेल तर तात्काळ BLOशी संपर्क करा

SIR प्रक्रियेदरम्यान एखाद्या पात्र मतदाराचे नाव अनावधानाने वरील यादीत आले असेल, तर संबंधित मतदारांनी घाबरून जाण्याची गरज नाही. प्रशासनाने अशा मतदारांना तत्काळ आपल्या क्षेत्रातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

तसेच, मतदाराचा अचूक पत्ता उपलब्ध न झाल्यामुळे संबंधित BLOने त्याला ‘Uncollectable’ वर्गवारीत टाकले असल्यास किंवा मतदाराने आपले Enumeration Form संबंधित BLOकडे जमा केले नसल्यामुळे नाव वरील यादीत आले असल्यास, योग्य माहिती देऊन पुढील कार्यवाही करता येणार आहे.

गणनापत्रक ‘Rollback’ करून पुन्हा भरता येणार

अशा प्रकरणांमध्ये संबंधित मतदारांनी गणनापत्रकाचे Rollback करून आवश्यक त्या अचूक तपशीलासह ते पुन्हा भरून द्यावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.त्यामुळे मतदारांनी केवळ यादी प्रसिद्ध झाली म्हणून दुर्लक्ष न करता आपले नाव आणि तपशील काळजीपूर्वक तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राजकीय पक्षांनाही आवाहन

जिल्ह्यातील सर्व नागरिक, मतदार, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या याद्यांची सखोल पाहणी करून आवश्यक त्या दुरुस्तीसाठी तातडीने कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.एकही पात्र मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये, यासाठी मतदारांनी स्वतःचे नाव तपासून पाहावे आणि काही त्रुटी आढळल्यास तातडीने संबंधित BLOशी संपर्क साधावा, असे प्रशासनाने म्हटले आहे.