बुलढाण्यात आज ‘गुंतवणुकीचा महामेळावा’! उद्योगांसाठी मोठ्या संधी, कोट्यवधींच्या सामंजस्य कराराकडे उद्योग जगताचे जिल्ह्याचे लक्ष; पालकमंत्री मकरंद पाटलांच्या हस्ते होणार उद्घाटन...

 
 बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह  वृत्तसेवा): जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली ‘बुलढाणा जिल्हा गुंतवणूक परिषद २०२६’ आज, शुक्रवार १४ ऑगस्ट रोजी बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी क्लब, मलकापूर रोड येथे होत आहे. सकाळी १० वाजता सुरू होणाऱ्या या परिषदेकडे जिल्ह्यातील उद्योग, व्यवसाय आणि रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे.जिल्ह्यात नव्या उद्योगांची उभारणी व्हावी, स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, स्थानिक उद्योजकांना विस्तारासाठी पाठबळ मिळावे आणि बाहेरील गुंतवणूकदारांना बुलढाण्यातील संधींची माहिती मिळावी, हा या परिषदेचा प्रमुख उद्देश आहे.

कृषी प्रक्रिया ते ऑटोमोबाईल; गुंतवणुकीसाठी अनेक क्षेत्रे

परिषदेत कृषी प्रक्रिया उद्योग, पर्यटन, ऑटोमोबाईल घटक तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME) क्षेत्रातील गुंतवणुकीच्या संधींबाबत माहिती देण्यात येणार आहे.उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक परवाने, शासनाच्या विविध योजना, उपलब्ध सवलती आणि उद्योग उभारणीची प्रक्रिया याबाबतही उद्योजकांना एकाच व्यासपीठावर माहिती मिळणार आहे. त्यामुळे नवउद्योजकांसाठी ही परिषद विशेष महत्त्वाची ठरणार आहे.

कोट्यवधींच्या गुंतवणुकीचे MoU होणार?

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी विविध नामांकित उद्योगसमूहांसोबत कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार (MoUs) करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हे करार प्रत्यक्षात किती गुंतवणूक आणि किती रोजगाराच्या संधी निर्माण करतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.या माध्यमातून बुलढाण्यातील औद्योगिक क्षेत्राला गती मिळण्यासोबतच स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

नवउद्योजक, शेतकरी उत्पादक कंपन्यांनाही संधी

या परिषदेसाठी जिल्ह्यातील नवउद्योजक, शेतकरी उत्पादक संस्था (FPOs), वित्तीय संस्था आणि उद्योग विभागाशी संबंधित यंत्रणांना जिल्हा उद्योग केंद्र, बुलढाणा यांच्या वतीने आमंत्रित करण्यात आले आहे.विशेषतः शेतीप्रधान बुलढाणा जिल्ह्यात कृषीमालावर आधारित प्रक्रिया उद्योगांना चालना मिळाल्यास शेतकऱ्यांना बाजारपेठ, मूल्यवर्धन आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

पालकमंत्री मकरंद जाधव (पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव (पाटील) यांच्या हस्ते या गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन होणार आहे. त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील उद्योग व गुंतवणुकीच्या संधींबाबत महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे.

आजच्या परिषदेत होणारे सामंजस्य करार, गुंतवणुकीच्या घोषणा आणि उद्योगांसाठीच्या संधी यामुळे बुलढाण्याच्या औद्योगिक विकासाला किती मोठी चालना मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.जिल्ह्यात उद्योग उभारणीसाठी उपलब्ध असलेल्या संधींचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक उद्योजकांनी या परिषदेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या सहायक आयुक्तांनी केले आहे.