मेहकरमध्ये साजरा झाला अभिनव ट्रॅक्टर पोळा; केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव झाले सारथी

 
 मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :राज्यात सर्वत्र सर्वात महत्त्वाचा सण बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, आधुनिक युगाशी सुसंगत असा एक आगळावेगळा उपक्रम मेहकरमध्ये साजरा झाला. येथील शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर पोळा साजरा करत शेतीतील ट्रॅक्टरच्या महत्त्वाला सलाम केला. या विशेष सोहळ्यात केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव स्वतः ट्रॅक्टरचे सारथी होऊन सहभागी झाले.गेल्या काही वर्षांपासून मेहकरातील हा ट्रॅक्टर पोळा आकर्षण ठरत आहे.
बैलपोळा हा सण पारंपरिकरित्या बैलांच्या सन्मानासाठी साजरा केला जातो. मात्र, आधुनिक युगात शेतीतील बहुतांश कामे ट्रॅक्टरच्या साहाय्याने केली जात असल्याने बैलांच्या बरोबरीने ट्रॅक्टरचाही गौरव व्हावा, या हेतूने मेहकर येथे ट्रॅक्टर पोळ्याचे आयोजन करण्यात आले.
शहरातील मुख्य मार्गावर काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत १५० ते २०० ट्रॅक्टर सहभागी झाले होते. वर्षभर शेतात राबणाऱ्या या आधुनिक सर्जा-राजांनाही यावेळी सणाचा आनंद मिळाला.
या अनोख्या ट्रॅक्टर पोळ्यात केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, माजी आमदार संजय रायमुलकर, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख ऋषिकेश जाधव यांच्यासह शेकडो शेतकरी आपल्या ट्रॅक्टरसह सहभागी झाले होते.