मुर्ती परिसरात बिबट्याचा वाढता वावर; नागरिकांत भीतीचे सावट, वनविभागाने तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी...
Mar 16, 2026, 10:59 IST
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मोताळा तालुक्यातील मुर्ती फाटा परिसरात मागील दहा ते पंधरा दिवसांपासून बिबट्याचा सातत्याने वावर दिसून येत असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः मुर्ती फाट्याजवळील नाल्याच्या परिसरात हा बिबट्या वारंवार दिसत असल्याने सकाळी व रात्री या मार्गाने ये-जा करणारे गावकरी तसेच शालेय विद्यार्थी प्रचंड दहशतीत आहेत.
मुर्ती फाटा ते मुर्ती गाव हे सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतरावर असून या मार्गावर मोठ्या प्रमाणात बागायती शेती आहे. परिसरात गहू, कांदा यासारखी पिके घेतली जातात. तसेच या भागात खोल नाला असून त्याचे खोलीकरण झाल्यामुळे त्यामध्ये वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध असते. उन्हाळ्याच्या दिवसातही हा परिसर थंड राहतो. त्यामुळेच बिबट्याने या भागात ठाण मांडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
गेल्या काही दिवसांत अनेक गावकऱ्यांना हा बिबट्या रस्त्यावरून फिरताना दिसून आला आहे. काही नागरिकांनी त्याचे छायाचित्रे आणि दृश्यचित्रणही केले आहे. आतापर्यंत बिबट्याने कोणावरही हल्ला केलेला नसला तरी भविष्यात अशी शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सकाळी व्यायामासाठी जाणारे नागरिक तसेच शाळेत ये-जा करणारे विद्यार्थी यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, या संदर्भात मुर्ती ग्रामपंचायतीचे सरपंच श्रीकृष्ण खराटे आणि ग्रामपंचायत सदस्य बाळू पाटील खाकरे यांनी वनविभागाला माहिती दिली आहे. बिबट्याने एखाद्यावर हल्ला करण्याची वाट न पाहता वनविभागाने तातडीने या परिसरात पिंजरा लावून किंवा सापळा रचून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी मुर्ती, वाघजाळ, टाकळी, वारुळी आणि परडा परिसरातील नागरिकांकडून जोर धरत आहे.