संध्याकाळी बैल घरी पोहचले पण मालक घरी आलेच नाहीत! मध्यरात्री मृतदेहच सापडला; सोमठाणा गावावर शोककळा!

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील सोमठाणा गावावर शोककळा पसरली आहे. सोमठाणा येथील भारत डिगांबर वाघमारे(३२) या शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झालाय. शेतकऱ्यावर आज शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार शेतकरी भारत वाघमारे यांच्या शेतात विहीर खोदण्याचे काम सुरू होते. विहिरीला चांगले पाणी देखील लागले होते. काल, दुपारी भारत वाघमारे हे गुरांना चारण्यासाठी शेतात गेले. सायंकाळी ते शेतातून घरी निघाले. दरम्यान सायंकाळी त्यांची गुरे घरी पोहचली मात्र भारत वाघमारे हे घरी पोहचले नाहीत. 
    त्यामुळे त्यांचा शोध सुरू करण्यात आला. मध्यरात्री दीड वाजता संतोष दशरथ ढवळे यांच्या शेतातील बाभळीच्या झाडाखाली भारत वाघमारे यांचा मृतदेह आढळला. वीज पडल्याने भारत वाघमारे यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी सोमठाणा गावात पोहचून वाघमारे कुटुंबीयांचे सांत्वन केले. पोलिसांनी व महसूल प्रशासनाने घटनास्थळी पोहचून पंचनामा केला, आज दुपारी वाघमारे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.