गांगलगावात संतप्त शेतकऱ्यांनी "या" शासन आदेशाची होळी केली!  म्हणाले, शेतकऱ्यांना विश्वासात घेतले नाही.

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा: ऋषी भोपळे): होळी पौर्णिमेला ठिकठिकाणी होळ्या पेटल्या, मोठ्या उत्साहात पारंपारिक पद्धतीने होळी पौर्णिमा संपन्न झाली. परंतु चिखली तालुक्यातील गांगलगावच्या शेतकऱ्यांनी अनोखी होळी पेटवली. ती म्हणजे ... भक्ती महामार्गचा शासन आदेश पेटवून. मातृतीर्थ सिंदखेड राजा ते संतनगरी शेगाव असा १०९ किलोमीटरच्या भक्ती महामार्गासाठी प्रक्रिया सुरू झालेली आहे. मात्र शेतकऱ्यांकडून याला मोठा विरोध केल्या जातोय. विश्वासात घेतल्या नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे गांगलगावात रविवार २४ मार्च रोजी , सायंकाळी शासन आदेशाची होळी पेटवून शेतकऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
   सिंदखेड राजा ते संत नगरी शेगाव हा भक्तिमार्ग समृद्धी महामार्गाला जोडणारा आहे. या परिसरातील शेतकऱ्यांना काहीही न सांगता, तसेच विश्वासात न घेता या महामार्गाच्या निर्मितीसाठी प्रशासन हालचाली करीत आहेत. मोजमाप सुरू करण्यात आली आहे, ठिकठिकाणी चिन्हे लावण्यात आली आहे. याआधी समृद्धी महामार्गाने शेतकऱ्यांच्या जमिनी बळकवण्याचा घाट घातलाच ! असा आरोप शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांनी केला आहे. यासंदर्भात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. या शासन आदेशाची होळी पेटवताना गांगलगाव येथील सर्व ग्रामस्थ तसेच नितीन सुरेश म्हस्के,शिवाजी म्हस्के, शिवशंकर म्हस्के, प्रमोद म्हस्के, संतोष म्हस्के , मंगेश म्हस्के, राजू महास्केत, रघु म्हस्के,अमोल म्हस्के, समाधान म्हस्के , ऋषिकेश शेळके यांची उपस्थित होती. काहीही झाले तरी या महामार्गासाठी जमिनी द्यायचे नाही असा निश्चय यावेळी ग्रामस्थांनी केला आहे.