घरगुती गॅसच्या अवैध वापरावर प्रशासनाचा बडगा; तपासणीसाठी विशेष पथके,
इंधन तुटवड्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क; गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी कारवाई...
Mar 10, 2026, 18:34 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : सध्याच्या जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन तुटवडा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने घरगुती गॅसच्या अवैध वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना सुरू केल्या आहेत. यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर दक्षता आणि फिरती तपासणी पथके स्थापन करण्यात आली असून ही पथके गॅस एजन्सींची अचानक तपासणी करणार आहेत.
शासनाच्या निर्देशानुसार घरगुती गॅसचे वितरण सुरळीत राहावे तसेच त्याचा व्यावसायिक किंवा इतर अवैध वापर होऊ नये यासाठी जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके गॅस एजन्सींसह वितरण प्रक्रियेची अचानक तपासणी (सप्राईज इन्स्पेक्शन) करून नियमांचे पालन होत आहे की नाही याची पडताळणी करणार आहेत.
सध्याच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन काही ठिकाणी गॅसचा अवैध साठा किंवा काळाबाजार होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासन सतर्क झाले आहे. घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर किंवा इतर अनधिकृत कारणांसाठी वापर आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान, नागरिकांनी इंधन तुटवड्याबाबत पसरविल्या जाणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच घरगुती गॅसचा आवश्यक तेवढाच वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केले आहे.