मलकापूरमध्ये बेकायदेशीर एलपीजी रिफिलिंगचा पर्दाफाश; पोलिसांची धडक कारवाई, ५ आरोपी जेरबंद
गरीबांच्या गॅसवर काळाबाजार! पोलिसांच्या छाप्यात १.०३ लाखांचा मुद्देमाल जप्त !

 
 मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत गरीब व गरजू नागरिकांना दिल्या जाणाऱ्या एलपीजी गॅसचा बेकायदेशीर वापर व काळाबाजार रोखण्यासाठी पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा रॅकेट उघडकीस आणले. मलकापूर शहरात विविध ठिकाणी छापे टाकून बेकायदेशीररीत्या गॅस सिलिंडरमधून वाहनांमध्ये रिफिलिंग करणाऱ्या पाच आरोपींवर अत्यावश्यक वस्तू अधिनियम (EC Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत १ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जिल्ह्यात घरगुती गॅसचा काळाबाजार, बेकायदेशीर वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी सर्व अधीनस्थ अधिकाऱ्यांना विशेष कारवाईचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक स्थापन करून छापेमारी करण्यात आली.
दि. १७ मार्च २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अपर पोलीस अधीक्षक खामगाव यांच्या पथकाने मलकापूर शहर पोलीस ठाणे हद्दीत मुश्ताक अलीनगर, पारपेठ, लालपुलाजवळ, भालेगाव रोड, शिवाजीनगर, संत श्री रविदासनगर आणि काशीरामपुरा या भागात एकाच वेळी छापे टाकले.
या कारवाईत आरोपी जाकीरखान सिकंदरखान (३७), नितीन गुणाजी परसे (४२), लक्ष्मण मोहन हंबर्डे (३२), शेरसिंह धनश्यामसिंह राजपूत (४०) आणि शाकीरखान सिकंदरखान (४१) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून प्रेशर पंप, विद्युत मोटार, रबरी नळ्या, नोजल, इलेक्ट्रिक बोर्ड आणि गॅस सिलिंडर असे गॅस रिफिलिंगसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या साहित्याची एकूण किंमत १,०३,००० रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने सहभाग घेतला. दरम्यान, गरीब व गरजू नागरिकांसाठी असलेल्या घरगुती गॅसचा गैरवापर करून काळाबाजार करणाऱ्यांविरोधात अशा प्रकारच्या धडक कारवाया पुढेही सुरू राहणार, असा स्पष्ट इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.