तुम्हाला अंचरवाडीला जायचे असेल तर जाऊच नका! पावसाळा सुरू झाला तरी पुलाचे काम अपूर्ण; शेतातून काढलेल्या पर्यायी रस्त्यावर दिवसभरात पन्नासेक मोटारसायकली धबाधब पडल्या..चार चाकी तर जातच नाही!
Updated: Jun 24, 2026, 19:03 IST
अंचरवाडी (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): होय..सध्या पावसाळा सुरू झालाय.. काही कामानिमित्त तुम्हाला अंचरवाडीला जायचे असेल तर जाऊच नका.. कारण गेलात तर फजिती होईल..आज पन्नासेक मोटरसायकलवाल्यांचे जे हाल झाले ते तुमचेही होईल..तुमच्याकडे चार चाकी असेल तरीही जाऊच नका! एकदा चारचाकी फसली तर काढायला ट्रॅक्टर बोलवावे लागेल, नाहीतर जेसीबी..त्यामुळे कशाला फजिती करून घेता..जाऊच नका..!! आता तुम्ही म्हणाल, हा काय अजब सल्ला..! तर त्याच कारण असं आहे की, अंचरवाडीच्या नदीवर पुलाचे काम सुरु आहे..उशिरा सुचलेले पुलाच्या बांधकामाचे हे शहाणपण अंगलट आले आहे. पावसाळा सुरू झाला तरी पूल पूर्ण झाला नाही. त्यामुळे उन्हाळ्यात शेजारच्या शेतातून काढलेला पर्यायी मार्ग आता पावसाळ्यात वापरण्यायोग्य राहिला नाही..कच्च्या रस्त्यात साचलेला प्रचंड चिखल, तुंबलेले पाणी यामुळे वाहनधारकांची अक्षरशः दैना होत आहे.
अंचरवाडी ते अंचरवाडी फाटा यादरम्यान असलेल्या नदीवर पुलाचे काम सुरू आहे. पावसाळा सुरू झाला तरी कामात होत असलेल्या दिरंगाईमुळे अद्याप काम पूर्ण झालेले नाही. संबंधितांनी उन्हाळ्यात पर्यायी रस्त्याची सोय केली होती, ती एका शेजारच्या शेतातून.मात्र आता पावसाळा सुरू झाल्याने निखळ शेतातून असलेल्या कच्चा रस्ता वापरण्यायोग्य राहिलेला नाही. पहिल्याच पावसात गावकऱ्यांची मोठी दैना झाली. पेरणीच्या तयारीसाठी गावाबाहेर जाणाऱ्या शेतकऱ्यांची अक्षरशः फजिती होत आहे. आज दिवसभरात पन्नासेक मोटारसायकली निसरड्या झालेल्या रस्त्यावरून धबाधब पडल्या. काही महिला देखील पडल्या..गावकऱ्यांकडून याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.काय करायचे ते करा पण पुलाचे काम वेळेत पूर्ण करा नाहीतर तीव्र आंदोलन छेडू अशा प्रतिक्रिया गावकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत..