"पुर्ण गावात माझा अपमान झालाय, आता माझा जगून काय फायदा" म्हणत तरुणाची विष घेऊन आत्महत्या!  चिखली तालुक्यातील हराळखेडची घटना! "त्या" ६ जणांनी त्याच्यासोबत असं काय केलं? वाचा..

 

चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): माणसांना सगळं सहन होईल पण अपमान सहन होत नाही. अनेकदा चारचौघात झालेला अपमान जिव्हारी लागतो अन् मग हातून नको ते कृत्य होते. चिखली तालुक्यातील अमडापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या हराळखेड येथील कैलास बोक्से (२६) या तरुणासोबतच तसाच प्रकार घडला. गावच्या भरचौकात आपला अपमान झाला, आता जगून काय फायदा असे म्हणत कैलास ने विष प्राशन करून आत्महत्या केली. कैलास च्या वडिलांनी याप्रकरणी अमडापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी आत्महत्येस कारणीभूत ठरणाऱ्या ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे सगळे आरोपी हे मृतक कैलासच्या भावकीतील आहेत. 

हनुमान जयंतीच्या दिवशी मृतक कैलासची पत्नी सृष्टी बोक्से गावात पंगतीत जेवायला गेली होती. तिथे   त्यांची नातेवाईक ममता निकम ( रा.चिखली) हिने सृष्टी सोबत कौटुंबिक कारणावरून वाद घातला. घरी आल्यानंतर सृष्टी ने घडला प्रकार पतीला सांगितल्यानंतर कैलास त्याचा जाब विचारण्यासाठी गेला. ममता निकम ही कैलासच्या भावकीतील रामेश्वर बोक्से याची आत्या आहे. त्यावेळी कैलास ला मारहाण झाली. ही बाब कैलास ने वडिलांना सांगितली असता कैलासच्या वडिलांनी समजूत काढत जाऊदे आपण उद्या पाहू असे म्हटले.
   
दरम्यान  दुसऱ्या दिवशी सकाळी कैलास ला गावातील हनुमान चौकात ममता निकम व तिचे नातेवाईक रामेश्वर अशोक बोक्से,  गजानन संतोष बोक्से , राजू श्रीकिसन बोक्से, परमेश्वर अशोक बोक्से, अलका राजू बोक्से  या सर्वांनी लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केली. जखमी व घाबरलेल्या अवस्थेत कैलास धावत पळत घरी आला. वडील व भावांनी विचारणा केल्यावर त्याने घडला प्रकार सांगितला, त्याचवेळी वडिलांच्या हाताला झटका देऊन कैलास गोठ्याकडे पळाला आणि गोठ्यातील पिशवीत ठेवलेले विषारी औषध प्राशन केले, तेवढ्यात कैलासचा भाऊ  सोपान तिथे पोहचला त्याने कैलासच्या हातावर चापट मारल्याने विषाची बाटली हातून निसटली. कैलास खाली जमिनीवर पडला. "मला हनुमान चौकार मारहाण झाली,माझी बदनामी झाली ,आता माझा जगून काय फायदा" असे कैलास यावेळी म्हणाला.दरम्यान त्याला तातडीने चिखली येथे उपचारासाठी हलविण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कैलासच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून मारहाण करणाऱ्या ६ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्हा दाखल केला आहे.