भानखेड-बेराळा फाट्याजवळ भीषण दुचाकी अपघात; ४७ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू!

 
 चिखली :( बुलढाणा लाईव्ह वृत्तसेवा ):जालना महामार्गावरील भानखेड-बेराळा फाट्याजवळ झालेल्या भीषण दुचाकी अपघातात एका ४७ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. विनोद तुकाराम कहाडे (वय ४७, रा. रामानंद नगर, चिखली) असे मृताचे नाव आहे. रविवार, ९ नोव्हेंबर रोजी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, महामार्गावरील धोकादायक वळणांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Advt 👆

मिळालेल्या माहितीनुसार, विनोद कहाडे हे शेतातून घरी परतण्यासाठी दुचाकीने जात होते. दरम्यान, भानखेड ते बेराळा फाट्यादरम्यान असलेल्या धोकादायक वळणावर त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच ११२ क्रमांकावरून पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी विनोद कहाडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.

या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे प्राथमिक अंदाजातून समोर आले आहे. घटनास्थळावरील परिस्थिती पाहता, अनेक दिवसांपासून पडून असलेल्या लोखंडी फलकाचा धक्का लागल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली असावी, अशी शक्यताही व्यक्त होत आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, या महामार्गावरील भानखेड-बेराळा फाट्यादरम्यानची दोन्ही धोकादायक वळणे तातडीने सरळ करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. यापूर्वीही या ठिकाणी अपघात घडल्याने वाहनधारकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला असून, चिखली पोलीस पुढील तपास करीत आहेत.