बुलढाण्यात पोलीस स्मृतिदिनानिमित्त शहीद पोलिसांना भावपूर्ण अभिवादन; कर्तव्य बजावताना प्राण अर्पण करणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान! पोलीस अधीक्षक कार्यालयात स्मृतिदिन कार्यक्रम;

 जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांच्या हस्ते शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांना कृतज्ञता पत्र व भेटवस्तू प्रदान, पोलीस दलाने जागविल्या वीर जवानांच्या स्मृती....

 
 बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देशाच्या सुरक्षेसाठी आणि नागरिकांच्या रक्षणासाठी कर्तव्य बजावताना प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलीस जवानांच्या त्यागाचे स्मरण करत बुलढाणा पोलीस अधीक्षक कार्यालयात २१ ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृतिदिन कार्यक्रम पार पडला. यावेळी शहीद पोलिसांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, तर त्यांच्या कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक सन्मानित करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांच्या हस्ते शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांना कृतज्ञता पत्र आणि भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या.देशाच्या रक्षणासाठी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी अहोरात्र कार्यरत असतात. कर्तव्य बजावताना प्राणांचे बलिदान देणाऱ्या या वीरांच्या शौर्याची आणि त्यागाची आठवण कायम ठेवण्यासाठी दरवर्षी २१ ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृतिदिन (Police Commemoration Day) म्हणून पाळला जातो.

 ​​​​

शहीद पोलिसांच्या त्यागाला मानाचा मुजरा

पोलीस मुख्यालय, बुलढाणा येथे सकाळी ८ वाजता आयोजित या कार्यक्रमात देशभरातील शहीद पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या बलिदानाचे स्मरण करण्यात आले. त्यांच्या शौर्याला सलाम करत उपस्थितांनी श्रद्धांजली अर्पण केली. शहीद जवानांनी देशसेवेसाठी दिलेले योगदान आणि कर्तव्यनिष्ठा नव्या पिढीला प्रेरणा देणारी असल्याची भावना या कार्यक्रमातून व्यक्त झाली.महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नक्षलविरोधी मोहिमा, दहशतवादविरोधी लढाया तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या विविध मोहिमांमध्ये बजावलेल्या कर्तव्याचा गौरव यावेळी करण्यात आला. देशाच्या आणि समाजाच्या सुरक्षिततेसाठी प्राणांची पर्वा न करता काम करणाऱ्या जवानांच्या त्यागाचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान; प्रशासनाकडून कृतज्ञता व्यक्त

कार्यक्रमादरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील शहीद पोलीस अंमलदार पोशि./३६४१ सरजेराव एकनाथ खांडे (तत्कालीन नेमणूक : गडचिरोली) यांच्या कुटुंबीयांचा, तसेच शहीद पोलीस अंमलदार पोशि./३५३४ राजू नारायण गायकवाड (तत्कालीन नेमणूक : गडचिरोली) आणि स्फोअनि./८४८ विष्णू खंडुजी दसरे (तत्कालीन नेमणूक : बुलढाणा) यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला.या शहीद जवानांच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र पोलीस महासंचालक, मुंबई यांच्या स्वाक्षरीचे कृतज्ञता पत्र आणि भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या. जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. यावेळी शहीद जवानांच्या कुटुंबीयांप्रती प्रशासनाने कृतज्ञता व्यक्त केली.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक श्री. अमोल काशीद, अपर पोलीस अधीक्षक श्री. विलास यामावार, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, अंमलदार, मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

शहीद जवानांचे बलिदान सदैव प्रेरणादायी

पोलीस स्मृतिदिन हा केवळ शहीद जवानांचे स्मरण करण्याचा दिवस नसून, देशसेवा, कर्तव्यनिष्ठा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीरांच्या त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान करून त्यांच्या बलिदानाची आठवण जपण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.बुलढाणा पोलीस दलाच्या वतीने शहीद जवानांना आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या शौर्याचा वारसा जपत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धारही या स्मृतिदिनाच्या निमित्ताने अधोरेखित झाला.