आईसोबत मामाच्या गावी यात्रेला गेला; परतल्यावर लोखंडी पेटी उघडताच बसला धक्का! अंचरवाडीत ३.६७ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास!

 
 चिखली (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : घरात कुणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने लोखंडी पेटीत ठेवलेले तब्बल ३ लाख ६६ हजार ९८० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना चिखली तालुक्यातील अंचरवाडी येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी अंढेरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, अंचरवाडी येथील प्रितेश संजय परिहार (वय २३) हे २४ नोव्हेंबर रोजी आईसोबत मामाच्या गावी कोलारा येथे यात्रेसाठी गेले होते. जाण्यापूर्वी घरातील सोन्याचे दागिने लोखंडी पेटीत ठेवण्यात आले होते. २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ते घरी परतले. दुसऱ्या दिवशी सकाळी पेटी तपासली असता त्यातील सोन्याचे दागिने गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत वडिलांकडे विचारणा केली असता, घराचा दरवाजा उघडा ठेवून गावात फिरण्यासाठी गेलो होतो, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, २५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते ११.३० वाजेदरम्यान घरात कुणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने दागिने चोरून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये तीन तोळ्यांचा सौभाग्यवती हार (१ लाख ४७ हजार २० रुपये), दोन तोळ्यांची गहूमणी पोत (८४ हजार ९६० रुपये), एक तोळ्याची झुंबर वेल (७५ हजार रुपये) आणि दोन तोळ्यांचे गहूमणी दागिने (६० हजार रुपये) अशा एकूण आठ तोळ्यांच्या सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. या दागिन्यांची एकूण किंमत ३ लाख ६६ हजार ९८० रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.याप्रकरणी प्रितेश परिहार यांच्या तक्रारीवरून अंढेरा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.