हर्षवर्धन सपकाळ यांचे प्रदेशाध्यक्षपद जाणार? महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांचे शिष्टमंडळ दिल्लीत घेणार हायकमांडची भेट...
Jun 5, 2026, 16:15 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पहिल्यांदाच बुलढाणा जिल्ह्याच्या वाटेला आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद जाते की काय ? अशी भीती निर्माण झाली आहे. नुकतेच काँग्रेसमध्ये पार पडलेले संघटन सृजन अभियान वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.. अनेक जिल्ह्याध्यक्षांच्या नियुक्त्यावरून काँग्रेसमध्ये सध्या यादवी माजली आहे.. महाराष्ट्रातल्या बड्या काँग्रेस नेत्यांचे एक शिष्ट मंडळ दिल्लीत हायकमांडची भेट घेणार आहे..
बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार असलेले हर्षवर्धन सपकाळ राहुल गांधींच्या जवळच्या गोटातले आहेत. याआधी राजीव गांधी पंचायतराज समितीचे अध्यक्ष म्हणूनही सपकाळ यांची कारकिर्द उल्लेखनीय राहिली होती. मात्र आता त्यांची प्रदेशाध्यक्ष पदाची कारकीर्द वादळी ठरत आहे.. पक्षातल्या अनेक बड्या नेत्यांना सपकाळ यांनी शिस्त लावण्याचा प्रयत्न केला,मात्र बड्या नेत्यांना तो रुचलेला दिसत नाही.
काँग्रेसमध्ये सध्या संघटनात्मक बदलांचे वारे वाहत आहे. तालुकाध्यक्ष, तालुक्या आणि जिल्ह्याची सोशल मीडिया टीम यासह अनेक जबाबदाऱ्यांची घोषणा संघटन सृजन अभियानाच्या माध्यमातून झाली आहे. या अभियानामध्ये पारदर्शकता रहावी यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले गेले नसल्याचा सपकाळ विरोधी गटाचा ठपका आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हाध्यक्ष निवडीवरून तीव्र नाराजी आहेत, याशिवाय सपकाळ त्यांच्या मनासारखे वागतात,ते कुणाचेही ऐकून घेत नाहीत असेही या नेत्यांचे म्हणणे आहे. ८ जून रोजी दिल्लीत हे बडे नेते सपकाळांना हटवण्यासाठी दिल्लीत हाय–कमांडची भेट घेणार आहेत.