हंडा मोर्चा ने दणाणले मंगरूळ! पाण्यासाठी गावकऱ्यांची दमछाक; पाण्यासारखा पैसा वाहिला पण घोटभर पाणी मिळेना! पाण्याच्या नावावर पैसा कुणी खाल्ला? ग्रामस्थांचा संतप्त सवाल! ५ मे पासून करणार उपोषण....
Updated: May 1, 2026, 13:03 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील मंगरूळ गाव काल,३० एप्रिलच्या रणरणत्या उन्हात दणाणून निघाले. अंगाची लाही लाही करणाऱ्या या उन्हात गावकऱ्यांनी पाण्यासाठी अक्षरशः टाहो फोडला. निमित्त होते ग्रामस्थांनी ग्रामपंचायत आणि प्रशासनाच्या विरोधात काढलेल्या हंडा मोर्चाचे...
२०२० ते २०२१ या काळात प्रशासनाच्या यंत्रणेने मंगरूळचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी तब्बल ६७ लाख खर्च केले. यातील १० लाख विहिरीचे खोदकाम व बांधकामासाठी, व ५७ लाख रुपयांत विहिरी पासून मंगरूळ गावापर्यंत पाईपलाईन, मोटार पंप विज कनेक्शन, इत्यादी कामासाठी खर्च करण्यात आले. २०२१ मध्येच ही पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास गेली, संबंधित ठेकेदारांनी ती ग्रामपंचायतच्या ताब्यातही दिली..मात्र तेव्हापासून तर आजतागायत या योजनेतून पाण्याचा एक थेंबही गावकऱ्यांना मिळाला नाही. विशेष म्हणजे धरणात मुबलक पाणीसाठा असताना, असे का झाले? योजना पूर्ण होती की अपूर्ण? अपूर्ण असेल तर ती ग्रामपंचायतीने ताब्यात का घेतली? यामध्ये दोषी कोण? असा सवाल करीत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतवर हंडा मोर्चा काढला. शेकडोंच्या संख्येत ग्रामस्थ माता भगिनी या मोर्चात सहभागी झाल्या. विशेष म्हणजे याआधी ग्रामस्थांनी या विषयाचा वारंवार पाठपुरावा केला होता, मात्र मार्ग न निघाल्याने काल हंडा मोर्चा काढण्यात आला.
पैसे कुणी खाल्ले?
२०२१ मध्ये पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास जाऊन देखील त्या योजनेतून पाणी मिळाले नाही. त्याउलट ती योजना वगळून २०२१ ते आतापर्यंत गावकऱ्यांना पाणीपुरवठा करण्याच्या नावाखाली लाखो रुपये खर्च करण्यात आले. शासनाकडून खर्च केलेले हे पैसे कोणी खाल्ले? असा सवाल करीत दोषी असलेल्यांकडून हे पैसे वसूल करण्यात यावेत अशी मागणी ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. सदर प्रकरणाची चौकशी होऊन पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर ५ मे पासून चिखली पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.