क्रीडा संकुलांमधील सुविधांच्या दर्जाकडे पालकमंत्र्यांनी वेधले लक्ष!

जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समिती बैठक
 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात जिल्हा क्रीडा संकुल व तालुका क्रीडा संकुल आहेत. अनेक ठिकाणी क्रीडाविषयक सुविधा जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून देण्यात आल्या आहेत.  काही ठिकाणी क्रीडा सुविधा देण्याचे प्रस्तावित आहेत. उपलब्ध क्रीडा सुविधांचा दर्जा सुधारण्यात येऊन प्रस्तावित ठिकाणी दर्जेदार क्रीडा सुविधा निर्माण कराव्यात, अशा सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्री यांच्या दालनात जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठक काल, ७ जानेवारीला घेण्यात आली. त्यावेळी आढावा घेताना पालकमंत्री बोलत होते. यावेळी आमदार संजय गायकवाड, अशासकीय सदस्य संदीप मेहेत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, शिक्षणाधिकारी श्री.मुकुंद आदी उपस्थित होते.

क्रीडा संकुलांमध्ये मानधन तत्त्वावर कार्यरत असलेल्या व्यक्तींचे मानधन वाढविण्याच्या सूचना देत पालकमंत्री डॉ. शिंगणे म्हणाले, की सध्या कार्यरत असलेल्या मानधन तत्वावरील व्यक्तींना तुटपुंजे मानधन देण्यात येते. शिपाई पदावर कार्यरत असलेल्यांचे मानधन ३ हजार रुपये व लिपिकाचे मानधन ५ हजार रुपये करावे. तसेच क्रीडा संकुलांमध्ये साफसफाईची कामे नियमितपणे करण्यात यावी. यासाठी तालुका क्रीडा अधिकाऱ्यांना समितीच्या निधीमधून स्थानिक स्तरावर १० हजार रुपये खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

जिल्हा क्रीडा संकुलामध्ये प्रेक्षक गॅलरी करण्यात येऊन लाईट्स लावण्यात यावे. जेणेकरून खेळाडू व प्रेक्षकांना सुविधा होईल. जिजामाता व्यापारी संकुलातील गाळे धारकांकडून गाळ्यांसाठी नियमानुसार भाडे आकारणी करण्यात यावी, अशी सूचनाही पालकमंत्र्यांनी केली. बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.