कर्जमाफीबद्दल कृतज्ञता, वाढदिवसानिमित्त समाजसेवेचा संकल्प! मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त चिखलीत रक्तदान शिबिरे, शेतरस्त्यांचे भूमिपूजन; आ. श्वेता महाले यांचा पुढाकार...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ औपचारिक शुभेच्छांपुरते कार्यक्रम न ठेवता समाजोपयोगी आणि विकासाभिमुख उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आमदार श्वेता महाले पाटील यांनी सांगितले. त्यानुसार मतदारसंघातील विविध गावांमध्ये रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात येणार असून, मातोश्री पांदन रस्ते योजनेतून साकारलेल्या शेतरस्त्यांचे भूमिपूजनही करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात ग्रामीण विकासाला नवी गती मिळाल्याचा दावा करत आमदार महाले यांनी मातोश्री पांदन रस्ते योजनेचा विशेष उल्लेख केला. या योजनेमुळे चिखली विधानसभा मतदारसंघातील अनेक शेतांपर्यंत बारमाही रस्ते पोहोचले असून, शेतकऱ्यांच्या शेतीमालाची वाहतूक, शेतीची कामे आणि ग्रामीण दळणवळण अधिक सुलभ झाले आहे. अनेक वर्षांपासून रस्त्याअभावी अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा मोठा लाभ झाल्याचे त्यांनी नमूद केले.
रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचा संदेश देत समाजाप्रती आपली बांधिलकी अधोरेखित करण्याचाही प्रयत्न या उपक्रमांतून करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा मोठा निर्णय जाहीर केला असून, या निर्णयामुळे लाखो शेतकरी कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. शेतकरीहिताच्या या भूमिकेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच विकास आणि समाजसेवेचा संदेश अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने हे उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे आमदार श्वेता महाले पाटील यांनी सांगितले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या समाजोपयोगी उपक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, रक्तदान करून सामाजिक जबाबदारी पार पाडावी तसेच मातोश्री पांदन रस्ते योजनेतून साकारलेल्या शेतरस्त्यांच्या भूमिपूजन कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहनही आमदार श्वेता महाले पाटील यांनी केले.