ग्रामसेवकाला पडला वसंतराव नाईकांच्या जयंतीचा विसर! ग्रामपंचायत कार्यालय उघडले नाही! ग्रामस्थांचा संताप, बडतर्फीची मागणी! बुलढाणा तालुक्यातील पळसखेड नाईक येथील घटना...
१ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजऱ्या केल्या जाणाऱ्या वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त पळसखेळ नाईक व नागो गावातील शेतकरी, कामगार आणि शालेय विद्यार्थी सकाळी सात वाजेपासून ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित होते. मात्र, कार्यालय बंद असल्याने आणि ग्रामसेवक इंगळे यांचा संपर्क साधूनही त्यांनी कार्यालय उघडण्यास स्पष्ट नकार दिला.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, इंगळे यांनी – “आज कोणतीही जयंती नाही, आणि तुम्हाला काही कामधंदा नाही का? फोटो खुर्चीवर ठेवून हार घालण्याची सवय लागली आहे,”अशा प्रकारची उद्धट वागणूक दिली. यामुळे ग्रामस्थांनी बंद असलेल्या कार्यालयासमोरच जयंती साजरी केली.
या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण असून, इंगळे यांच्यावर तत्काळ निलंबन किंवा बडतर्फीची कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. सामाजिक सलोखा आणि नेतृत्वाचा सन्मान राखण्याच्या दृष्टीने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे राठोड यांनी निवेदनात नमूद केले आहे.