जिल्ह्यातील ग्रामरोजगार सेवकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा; २ ऑक्टोबरपासून काम बंद आंदोलनाचा इशारा...
Updated: Oct 1, 2026, 20:33 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यातील ग्रामरोजगार सेवकांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर डफडे बजाव आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चामध्ये जिल्ह्यातील ग्रामरोजगार सेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रलंबित मागण्या तातडीने मान्य न झाल्यास २ ऑक्टोबरपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
ग्रामरोजगार सेवकांच्या मानधनाचा प्रश्न हा या आंदोलनाचा प्रमुख मुद्दा आहे. शासनाने ३ ऑगस्ट २०२४ चा शासन निर्णय तात्काळ लागू करावा, गेल्या २४ महिन्यांचे थकीत मानधन त्वरित जमा करावे, तसेच ग्रामरोजगार सहाय्यकांना विमा संरक्षण लागू करावे, यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे.
मनरेगा तसेच घरकुल योजनेसह ग्रामपंचायत स्तरावरील विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत ग्रामरोजगार सेवकांची महत्त्वाची भूमिका असते. मात्र, विविध मागण्या आणि मानधनाचा प्रश्न प्रलंबित असल्याने ग्रामरोजगार सेवकांमध्ये नाराजी असल्याचे यावेळी दिसून आले.
दरम्यान, २ ऑक्टोबरपासून काम बंद आंदोलन पुकारण्याचा निर्णय ग्रामरोजगार सेवकांनी घेतला आहे. शासनाने आपल्या मागण्यांची तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली.