जिल्ह्यातील लाखो रेशनकार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी ! रेशन धान्य मिळवणे झाले सोपे, लाभार्थ्यांची गैरसोय दूर! कशी ती बातमीत वाचा.. 

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यातील लाखो रेशनकार्ड धारकासाठी एक आनंद वार्ता आहे. आता तुमच्या हाताच्या कोणत्याही बोटाचा ठसा उमटला नाही तरी तुम्हाला हक्काचे रेशन धान्य मिळणार आहे. तसेच 'बायो मेट्रिक' ओळख पटविण्याची प्रक्रिया देखील जलदगतीने होणार आहे.यामुळे जिल्ह्यातील लाखो लाभार्थ्यांचीच नव्हे दीड हजारावर रेशन दुकानदारांचीही मोठी अडचण दूर होणार आहे.
याचे कारण म्हणजे जिल्ह्याला नव्या कोऱ्या ४ जी ई- पॉस मशिन प्राप्त झाल्या आहे. यात हाताची बोटेच नव्हे तर डोळ्यांचे 'स्कॅनिंग' करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. ठसे उमटले नाही तर डोळ्यांचे स्कॅनिंग करून कार्ड धारकाची ओळख पटवून त्याला धान्य देता येणार आहे. त्यामुळे कोणताही लाभार्थी धान्यापासून वंचित राहणार नाही. पूर्वीच्या मशीन मध्ये ही सुविधा नव्हती. तसेच जुन्या ई- पॉस मशीन २ जी होत्या. त्यामुळे मंद गती नेटवर्क मुळे एका लाभार्थ्याचे ठसे घ्यायला खूप वेळ लागायचा. यामुळे दुकानदार, तक्रार निवारण यंत्रणा देखील कंटाळल्या होत्या . फाईव्ह जी काळात २ जी च्या या मशीन कालबाह्य ठरल्या होत्या.
   या पार्श्वभूमीवर जिल्ह्याला आधुनिक व फोर जी ई- पॉस मशीन प्राप्त झाल्या आहेत. जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून १३ तहसिल कार्यलयाना या मशिनचे वितरण करण्यात आले आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी वीणा बसय्ये यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलच्या माध्यमाने १५३६ दुकानदारांना याचे वेळापत्रक नुसार वाटप करण्यात येत आहे. या दुकानांचा तालुकनिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे. बुलढाणा तालुका १५० दुकाने, चिखली १७१, देऊळगाव राजा ८३ , सिंदखेडराजा १२३, मेहकर १७९ , मोताळा १११, मलकापूर ८१,नांदुरा १०२,
जळगाव जामोद ९९, संग्रामपूर ९८, खामगाव १५८, शेगाव ९०. 
दरम्यान मागील २०१८ मध्ये सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीत बायोमेट्रिक पद्धतीचा (पॉस मशीनचा) वापर करण्यास सुरुवात झाली. धान्याच्या अफरातफरला व दुकानदारांच्या मनमानीला पायबंद घालणाऱ्या या पद्धतीने धान्य प्रणालीत क्रांती आणली. मात्र २ जी मुळे अलीकडे ही योजना मोठी डोकेदुखी ठरली. आय स्कॅनर ४जी मशीनने आता वितरणाला आधुनिक तंत्रज्ञानाचे पाठबळ मिळाले आहे.
साडेचार लाख लाभार्थी ! 
दरम्यान ४ जी मुळे ४लाख ४६ हजार ९२१ लाभार्थ्यांना कोणत्याही अडचणी शिवाय आणि जलदगतीने धान्य मिळणार आहे. त्यांची मोठी डोकेदुखी दूर झाली आहे. जिल्ह्यात अंत्योदय योजनेचे ६३ हजार ५२६, पीएचएच (केशरी कार्ड) चे ३ लाख ८३ हजार ३९५ लाभार्थी आहेत. एएल शेतकरी योजनेचे ६६, ५०५ लाभार्थी आहेत. मात्र अलीकडे त्यांना धान्य देणे बंद करण्यात आले असून त्याऐवजी त्यांच्या खात्यात थेट पैसे जमा करण्यात येत आहे.