शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी! उशीर करू नका! महाडीबीटीवर अर्ज प्रक्रिया सुरू; पीक प्रात्यक्षिके व "मिनीकीट" वितरणासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन...

 
 बुलढाणा,(जिमाका/बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानांतर्गत अन्नधान्य पिके तसेच वाणिज्य पिके (कापूस) यासाठी सन २०२६-२७ या वर्षात विविध योजना राबविण्यात येत असून, पीक प्रात्यक्षिके व कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत प्रमाणित बियाणे संच वाटप (मिनीकीट वितरण) कार्यक्रमासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत पीक प्रात्यक्षिक गटांचे अर्ज, प्रमाणित बियाणे वितरण तसेच मिनीकीट वाटपासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी प्रणालीद्वारे अर्ज करता येणार आहेत. जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी महा-डीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन “बियाणे” या घटकांतर्गत ऑनलाईन अर्ज सादर करावेत. “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्त्वावर लाभार्थी निवड करण्यात येणार असल्याने अर्ज प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. संतोष डाबरे यांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. कृषी उत्पादनवाढ, दर्जेदार बियाण्यांचा वापर आणि आधुनिक शेती पद्धतींचा प्रसार करण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.