गौरवास्पद! बुलढाण्याच्या प्रियंका राठी यांची शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी; फार्मास्युटिकल सायन्सेसमध्ये पीएच.डी. पदवीने जिल्ह्याचा गौरव....

 
 बुलढाणा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बुलढाणा जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी उल्लेखनीय कामगिरी प्रियंका चित्तरंजन राठी यांनी केली आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने फार्मास्युटिकल सायन्सेस विषयातील त्यांच्या संशोधन कार्याला मान्यता देत त्यांना 'आचार्य' (डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी – पीएच.डी.) ही सर्वोच्च शैक्षणिक पदवी प्रदान केली आहे.

प्रियंका चित्तरंजन राठी यांनी "Studies on Gums and Mucilages Obtained from Plant Material for Their Sustained Release Property" या विषयावर संशोधन केले. वनस्पतींपासून प्राप्त होणाऱ्या गम्स आणि म्युसिलेजच्या 'सस्टेन्ड रिलीज' गुणधर्मांचा अभ्यास करणारा हा संशोधन प्रबंध संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने मान्य केला असून त्यांना पीएच.डी. पदवी बहाल करण्यात आली आहे.हे संशोधन कार्य त्यांनी अनुराधा कॉलेज ऑफ फार्मसी, चिखली येथील संशोधन केंद्रात पूर्ण केले. या संशोधनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास आर. बियाणी यांचे त्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झालेल्या संशोधनामुळे फार्मास्युटिकल सायन्सेस क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान मिळाल्याचे मानले जात आहे.

संशोधनाच्या अंतिम टप्प्यातील ओपन डिफेन्स कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी चन्नबसवेश्वर फार्मसी कॉलेज, लातूरचे प्राचार्य डॉ. अविनाश टेकाडे यांनी बाह्यपरीक्षक म्हणून संशोधन प्रबंधाचे परीक्षण केले. प्रियंका राठी यांनी संशोधनाची उद्दिष्टे, कार्यपद्धती, निष्कर्ष आणि साहित्यिक योगदान यांचे प्रभावी सादरीकरण केले. उपस्थित प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी आत्मविश्वासाने व अभ्यासपूर्ण उत्तरे देत आपल्या संशोधनाची गुणवत्ता सिद्ध केली.

पीएच.डी. पदवी प्राप्त झाल्यानंतर प्रियंका राठी यांच्यावर शैक्षणिक, साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आपल्या यशाचे श्रेय त्यांनी मार्गदर्शक प्राचार्य डॉ. कैलास आर. बियाणी, 'आचार्य कक्ष', संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, कुटुंबीय, मित्र तसेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांना दिले आहे.

प्रियंका राठी यांच्या या उल्लेखनीय यशामुळे चिखलीसह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा मान उंचावला असून फार्मास्युटिकल सायन्सेस क्षेत्रातही त्यांच्या संशोधनाची दखल घेतली जात आहे. त्यांच्या या यशामुळे संशोधन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्या प्रेरणादायी ठरल्या आहेत.