बळीराजाला दुष्काळातून सावरण्याची शक्ती दे! प्रतापराव जाधवांनी माँ वैष्णोदेवीच्या चरणी काय मागितलं?

 
 बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देशवासीयांना निरोगी आरोग्य लाभावे, देशात सुख-शांती आणि समृद्धी नांदावी, तसेच दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या बळीराजाला संकटातून सावरण्याची शक्ती मिळावी, अशी प्रार्थना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी माँ वैष्णोदेवीच्या चरणी केली. शिवसेनेच्या वैष्णोदेवी-कटरा नवरात्र छडी यात्रेत सहभागी होत त्यांनी घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर सपत्नीक विधिवत पूजा आणि महाआरती केली.

प्रतापराव जाधव सपत्नीक वैष्णोदेवीच्या चरणी नतमस्तक!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून १९८३ मध्ये सुरू झालेली माँ वैष्णोदेवीची पवित्र छडी यात्रा श्रद्धा आणि भक्तिभावाने यंदाही सुरू झाली. शिवसेनेचे मुख्यनेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या यात्रेत केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव सहभागी झाले.जम्मू येथील ऐतिहासिक श्री रघुनाथ मंदिरातून पवित्र छडी आणि अखंड ज्योत घेऊन निघालेली ही यात्रा कटरा मार्गे माँ वैष्णोदेवीच्या मुख्य भवनापर्यंत पोहोचली. घटस्थापनेच्या मुहूर्तावर प्रतापराव जाधव आणि राजश्री जाधव यांनी सपत्नीक माँ वैष्णोदेवीची विधिवत पूजा करून महाआरती केली. यावेळी पवित्र छडीचेही पूजन करण्यात आले.

देशवासीयांच्या आरोग्यासाठी, शेतकऱ्यांच्या संकटमुक्तीसाठी प्रार्थना

या धार्मिक सोहळ्याच्या निमित्ताने प्रतापराव जाधव यांनी देशवासीयांच्या सुखी, समृद्ध आणि निरोगी जीवनासाठी प्रार्थना केली. देशात सुख, शांती, समृद्धी आणि बंधुभाव कायम राहावा, प्रत्येकाचे जीवन संकटमुक्त व्हावे, तसेच दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यातून बाहेर पडण्याचे बळ मिळावे, अशी भावना त्यांनी माँ वैष्णोदेवीच्या चरणी व्यक्त केली.श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक सलोख्याची परंपरा जपणाऱ्या या छडी यात्रेत प्रतापराव जाधव यांच्या सहभागामुळे नवरात्रोत्सवाच्या धार्मिक वातावरणात भक्तिभावाचे दर्शन घडले.