संतनगरीत गजानन भक्तांची मांदियाळी! गुरुवार अन् एकादशीचा योग; सुमारे लाखावर भाविक शेगावात; ३१ डिसेंबरला मंदिर राहणार रात्रभर खुले....
Updated: Dec 26, 2024, 15:36 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार, एकादशी आणि ख्रिसमस निमित्त सुट्टी यामुळे विदर्भ पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतनगरी शेगावात "गजानन भक्तांची" मांदियाळी दिसून आली.
नाताळ सणानिमित्त मुंबई, पुणे तसेच विदर्भ, मराठवाडा,यासह अन्य ठिकाणच्या शाळा महाविद्यालय ऑफिसेसला असणाऱ्या दीर्घकालीन सुट्ट्यांमुळे शेगावला श्रींचे दर्शनास मोठ्या प्रमाणावर भाविक गर्दी उसळली आहे.
वर्षाच्या अखेरी डिसेंबरमध्ये येणाऱ्या सलग सुट्ट्यांमुळे शेगावला श्रींचे दर्शनासाठी अनेक ठिकाणाहून भाविक भक्तांचा ओढा मोठ्या प्रमाणावर असतो.शेगाव येथे येणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या, एसटी बसेसमधून मोठ्या प्रमाणात भाविक व प्रवासी बाहेर पडताना दिसतात. यामुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. श्रींचे दर्शनासाठी भाविकांना सरासरी तीन तासांचा अवधी लागत आहे. श्रीमुख दर्शनासाठी २० मिनिटे वेळ लागत आहे.
श्री संस्थानकडून भाविकांसाठी आज पहाटे ४ वाजता पासून श्रींचे मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात येत आहे भाविकांसाठी एकेरी मार्ग करण्यात आला असून मंदिरामध्ये सकाळी १० ते ५ पर्यंत महाप्रसाद . श्रींच्या भाविकांसाठी संस्थानच्या वतीने श्रींचे दर्शनबारी व श्रीमुख दर्शनबारी, महाप्रसाद, पारायण मंडप, श्रींची गादी तसेच औदुंबर दर्शनाची व्यवस्था केली आहे. तसेच भक्तांच्या सोयीसाठी संस्थानच्या भक्त निवासाची नियमानुसार राहण्याची व्यवस्था नित्याप्रमाणे सुरू आहे. संपूर्ण मंदिर परिसरात स्वच्छता ही भक्तांना श्रींच्या प्रति आपली आस्था प्रसन्न मनाने एकरूप करणारी आहे. भक्तांना कोणताही त्रास होवू नये यासाठी श्रींचे सेवेकरी आपली सेवा देण्यास तत्पर आहेत.
३१ डिसेंबर रोजी मंदिर रात्रभर खुले...
श्री संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागता निमित्त शेगांव श्रींच्या दर्शनासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेवून समाधी मंदिर वार मंगळवार दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोजी दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे रात्री येणाऱ्या भाविकांना पहाटे श्रींचे दर्शन, महाप्रसाद घेऊन नविन वर्षाची सुरुवात करणार आहेत...