"कर्मभूमी ते गुरुभूमी "पायी वारी सोहळा उत्साहात....प्राणपणाने नाम जपा - समर्थ सद्गुरू श्रीहरी महाराजांचा उपदेश...

 
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सांसारिक जीवनात भौतिक सोईसाठी जसा अट्टाहास सुरू असतो, त्या तुलनेत ज्यासाठी आपला जन्म झाला त्या ईश्वरप्राप्तीसाठी मनाची उन्मनी अवस्था कमी आहे. ईश्वरप्राप्तीसाठी नामस्मरणाचा नित्य नियम ठेवणे गरजेचे आहे. संतांनी आपल्याला अनुभवातून नामस्मरणाचे महत्व पटवून दिले आहे. कलियुगात तरुन जाण्यासाठी प्राणपणाने नाम जपा असे मौलिक मार्गदर्शन समर्थ सद्गुरु श्रीहरी महाराज (श्रीक्षेत्र माकोडी ) यांनी केले. 

राम नामाच्या प्रचार आणि प्रसारासाठी आपल संपुर्ण आयुष्य खर्ची घालत असलेले समर्थ सद्गुरु श्री. श्रीहरी महाराज (माकोडी) यांच्या वाढदिवसानिमित्त "कर्मभूमी ते गुरुभुमी" अर्थात बुलढाणा ते श्रीक्षेत्र माकोडी पायीवारी सोहळा भाविकांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. २ जुलै रोजी सकाळी बुलढाणा 
शहरातील मलकापूर रोडवरील गणेश नगरस्थित साईराम मंदिर येथून या पायीवारीला सुरुवात झाली. राजूर मार्गे वाघजाळफाटा, मोताळा येथे वारी पोहचेली. मोताळा येथे श्री. दोडे कुटुंबीयांकडे सायंकाळ उपासना झाल्यानंतर सहकार विद्या मंदिर येथे मुक्काम स्थळी विसावा झाला. दुसऱ्या दिवशी ३ जुलैला डिडोळाफाटा ते शेलापूर येथे दुपारी वारी पोहचली. दरम्यान खामगाव, अकोला येथून निघालेल्या पालखी देखील एकत्र आल्या. श्री. आमटे कुटुंबीयांनी भोजन सेवा दिली. सायंकाळ दरम्यान वारीने श्रीक्षेत्र माकोडी मुक्काम गाठला. दरम्यान शेलापुर येथे बुलढाणा, अकोला, खामगाव आणि परिसरातून आलेल्या इतर पायी दिंड्या व शेलापूर येथील भाविक त्यात सहभागी झाल्याने राम नामाचा जयघोष आणि भजनानंद घेत रिमझिम पावसाच्या सरींमध्ये भाविक तल्लीन झाले होते. आषाढ शुद्ध नवमीला ४ जुलै रोजी नित्यनेमाप्रमाणे काकड आरती झाल्यानंतर श्रीहरी महाराजांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी श्रीरामांच्या जयघोषात भाविकांनी फुगड्याचे फेर धरले. चैतन्य मंदिरात नामजप अखंड सुरू होता. नामस्मरणाचा , रामनामाचा ध्यास घ्या. ईश्वर नक्कीच कृपा करील. त्यासाठी कायम अनुसंधानात रहा, असेही श्रीहरी महाराजांनी सांगितले. दुपारी महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली.