चिखली नगरीचे माजी नगराध्यक्ष भाऊसाहेब लाहोटी यांचे निधन! प्रायोपवेशन करून केला मृत्यूचा स्वीकार! उद्या होणार अंत्यसंस्कार....

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली नगरीचे माजी नगराध्यक्ष भाऊसाहेब लाहोटी यांचे आज,२९ ऑगस्ट रोजी दुपारी निधन झाले. दुपारी सव्वातीनच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याप्रमाणे प्रायोपवेशन(आत्मार्पण) अर्थात अन्नत्याग करून त्यांनी देह सोडला.
Advt.👆
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले स्व.भाऊसाहेब लाहोटी उत्तम कब्बडीपटू, उत्तम वक्ते होते. शिक्षकी पेशातून स्वेच्छानिवृत्ती घेत त्यांनी व्यवसायाकडे लक्ष केंद्रित केले. १९८५ ते १९८८ या काळात त्यांनी चिखली नगरीचे नगराध्यक्ष पदाचा कारभार सांभाळला. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी जबाबदारी सांभाळली. वार्ध्यक्यामुळे त्यांना विस्मरण होत होते. त्यामुळे त्यांनी प्रायोपवेशन व्रत अर्थात अन्नाचा त्याग केला होता.अखेर आज त्यांनी अखेरचा श्वास घेत मृत्यूचा स्वीकार केला.उद्या,३० ऑगस्टला सकाळी १० वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. भाऊसाहेबांच्या निधनामुळे चिखली नगरीवर शोककळा पसरली आहे.