"या" कारणांमुळे बुलडाण्याच्या बाजारात गावरान आंबे दिसेना! कोणत्या आंब्यांना किती भाव? वाचा...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) एप्रिल, मे  महिना म्हणजे आंब्यांचा सिझन.  फळांचा राजा असलेल्या  आंब्यांचे  सर्वजण दिवाणे आहेत. मे मध्यांतर सुरू असला तरी प्रत्येकाच्या घरी  आंब्यांची वाढती आवक पाहता 'रसाळी' बेत केल्या जातोय.  बुलढाणा शहरातील   पोलीस ठाणे मार्ग, बाजार गल्ली,  चिखली रोड या भागांत मोठ्या प्रमाणात अजूनही आंब्यांची विक्री होताना दिसत आहे. बुलढाण्यात दशेरी, लंगडा, तोतापुरी , हापूस, अश्या नाना प्रकारच्या जातींचे आंबे विक्रीस आले आहेत. परंतु गावरान आंबे  अपवाद वगळता बाजारात दिसत नाहीत. तुरळक ठिकाणी दिसून आले तरी अवकाळी आणि गारपीटीमुळे जिल्ह्यातील गावरान आंब्यांची गळती झाली आहे.

   शहर पोलीस स्टेशन समोर देखील आंबा विक्रीसाठी बहुतांश दुकाने थाटली आहे. शिवाय घरगुती लोणच्यांसाठी कैरी फोडून देण्याची व्यवस्था देखील  बाजारात  आहे.  बुलडाणा शहरातील बाजारात  दशहरी आंबा १०० रुपये किलो, केशर १३०, तर हापूस १४० रुपये किलोच्या भावाने मिळत आहेत. या  सगळ्यांत गावरान आंबे दुर्मिळ झाल्याचे नागरीक सांगतात. गावरान आंब्यांची चव देखील महागली आहे. मागील तीन वर्षांत अवकाळीचा कहर सुरू आहे, शिवाय गावरान आंब्याची जुनी झाडी आता म्हातारी झाली आहेत. नव्या पिढीला सगळ काही इन्स्टंट हवे असल्याने उशिरा फळधारणा होणाऱ्या गावरान आंब्यांची लागवडही आता होतांना दिसत नाही त्याचाच परिणाम आता गावरान आंब्याच्या उत्पादनावर झाला आहे. आवक कमी असल्याने गावरान आंब्याचे भाव हापूस, केशरलाही मागे टाकत असल्याचे चित्र फळबाजारात आहे.

कोकणासह परराज्यातील आंबा बुलढाण्यात! 

बुलढाण्याच्या बाजारात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातून आंब्यांची आवक झाली आहे. त्यामध्ये हापूस आंब्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. शिवाय गुजरात मधून सुद्धा आंबा आणल्या असल्याचे इथल्या व्यापाऱ्यांनी सांगितले. आंबा आणण्यासाठी वाहतुकीचा खर्च मोठा खर्च लागल्याने  आंब्याचे भाव वधारले आहेत.