खंडाळा मकरध्वज येथे दोन शेतकऱ्यांच्या सोयाबीन सुडीला आग; लाखोंचे नुकसान!
अज्ञातांनी पेटवला गोठा; हतबल शेतकऱ्यांचा घास हिरावला...

 
 (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : आस्मानी संकटाने आधीच त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घासही हिरावून नेणारी संतापजनक घटना तालुक्यातील खंडाळा मकरध्वज शिवारात घडली . अज्ञातांनी ६ नोव्हेंबर च्या रात्री दोन शेतकऱ्यांच्या सोयाबीन सुडीसह गोठ्याला आग लावल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
अतिवृष्टीमुळे यंदा उत्पादनाचा खर्चही वसूल होणे कठीण असताना, शेतकरी मिलिंद नरेंद्र भटकर व डॉ. रजनीनाथ लक्ष्मणराव भटकर यांनी खंडाळा मकरध्वज येथील गट क्र. ७९ व ८० मधील एकूण २ हेक्टर ८० आर क्षेत्रातील सोयाबीनची सोंगणी करून सुड्या रचल्या होत्या. मात्र, ६ नोव्हेंबरच्या रात्री अज्ञातांनी शेतातील सुड्यांसह गोठा पेटवून दिला.
या आगीत मिलिंद भटकर यांच्या गोठ्यातील सुमारे ६० हजार रुपये किमतीचे शेतीपयोगी साहित्य आणि १.३० हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, तसेच त्यांचे काका डॉ. रजनीनाथ भटकर यांच्या १.५० हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन पूर्णतः जळून खाक झाले.
दोन्ही शेतकऱ्यांना मिळून सुमारे ४० क्विंटल सोयाबीनचे उत्पादन अपेक्षित होते. त्यानुसार २ लाख रुपयांचे सोयाबीन व ६० हजारांचे शेतीपयोगी साहित्य, असा एकूण २ लाख ६० हजार रुपयांचा तोटा झाल्याचा अंदाज आहे.
घटनेची माहिती मिळताच ग्राम महसूल अधिकारी प्रभाकर गवळी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी नईम सौदागर, रघुनाथ पवार, भागवत अंभोरे, समाधान मोरे आदी पंच उपस्थित होते.