अखेर भीती खरी ठरली!; लोणार सरोवराचे पाणी कमळजा देवीच्या मंदिरात शिरले; नवरात्राेत्सवात भाविक दर्शनापासून राहताहेत वंचित,सराेवराच्या पाणीपातळीत माेठी वाढ !
"लोणावळा"चा अनुभव
शनिवारी सकाळपासून पावसात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना धुक्यासारख्या वातावरणामुळे सरोवर परिसरात "लोणावळा"चा अनुभव आला. विधानसभा प्रचारादरम्यान आमदार सिद्धार्थ खरात यांनी "लोणारचे लोणावळा करू" असे आश्वासन दिले होते. आज मात्र, नैसर्गिक वातावरणामुळेच भक्तांनी त्या अनुभवाचा आनंद घेतल्याची चर्चा रंगली.
पाणीपातळी वाढण्यामागील कारणे
तज्ज्ञांच्या मते, शहरातील सांडपाणी थेट सरोवरात जाणे, ‘गोमुख विरजतीर्थ’, ‘पापहरेश्वर गोमुख’, ‘सीतानाहनी गोमुख’ यांसारख्या झऱ्यांचे अखंड वहाणे, तसेच रामगया परिसरातील कपारींतून येणारे पाणी आणि मे-जूनपासून झालेली अतिवृष्टी ही मुख्य कारणे आहेत. त्यामुळे सरोवरातील खाऱ्या पाण्याची क्षारता कमी होत असून मूळ जैविक रचना व भूगर्भीय वारसा धोक्यात येत आहे.
युनेस्को दर्जा धोक्यात?
लोणार सरोवराचा युनेस्कोच्या नोबल जिओपार्क यादीत समावेश व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, सततची मानवी हस्तक्षेप आणि पाणीपातळीतील बदलामुळे सरोवराचा पर्यावरणीय व ऐतिहासिक दर्जा धोक्यात आल्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.