गोविंद पानसरेंवर मरणोत्तर गुन्हा दाखल करा! आमदार संजय गायकवाड यांची नवी मागणी; म्हणाले, विदेशातून आर्थिक मदत मिळते का? तपासा...
Apr 27, 2026, 18:18 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): "शिवाजी कोण होता"? या पुस्तकावरून निर्माण झालेला वाद आमदार संजय गायकवाड यांच्या दिलगिरीनंतर शांत होईल असे वाटत होते. मात्र तसे काहीही झालेले नाही. उलट हा वाद आणखी चिघळत आहे. आमदार संजय गायकवाड यांनी शिवीगाळ प्रकरणावरून दिलगिरी व्यक्त केली असली तरी शीर्षकावर असलेला आक्षेप कायम असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यातच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार बुलढाण्यात येणार आहेत. ते या वादग्रस्त पुस्तकाचे वाचन करणार आहेत..अशातच आता आमदार संजय गायकवाड यांच्याकडून नवी मागणी करण्यात आली आहे. पुस्तकाचे लेखक कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर मरणोत्तर गुन्हा दाखल करा अशी मागणी आ.गायकवाड व त्यांच्या समर्थकांनी केली आहे..
संबंधित पुस्तकाच्या प्रकाशनासाठी विक्रीसाठी विदेशातून आर्थिक मदत मिळाली का? याचाही तपास करण्यात यावा अशी मागणी देखील आमदार गायकवाड यांनी केली आहे. पुस्तक छापणाऱ्यांवर विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा असेही जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण भारतासाठी महाराष्ट्रासाठी प्रेरणास्थान असून त्यांच्या नावाचा वापर करून काही प्रकाशक, लेखक आर्थिक फायदा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. "शिवाजी कोण होता?" या पुस्तकाद्वारे महाराजांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न होत असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे..