ताप, सर्दी, खोकल्याने बुलडाणेकर हैरान! दवाखान्यात गर्दी मावेना ! ऑक्टोबर हीटचा तडाखा सोयाबीन सोंगणाऱ्या मंजुरांसाठीही ठरतोय घातक; रात्री सलाईन घेऊन दिवसा कामावर हजर राहतात मजूर...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सध्या वातावरणात मोठे बदल होत आहेत. ऑक्टोबर हीट चा तडाखा भल्याभल्यांना घाम आणत आहे, या बदललेल्या वातावरणामुळे संपूर्ण जिल्ह्यातच ताप, सर्दी खोकल्याचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे नावाजलेल्या हॉस्पिटल मध्ये गर्दी मावत नाहीये..
बुलडाणा शहर तसे थंड समजले जात असले तरी दुपारचे तापमान ३१ अंश सेल्सिअस पर्यंत नोंदवले जात आहे. तर रात्रीला मात्र किमान तापमानात घट होत असून ते २१ अंश सेल्सिअस पर्यंत जात आहेत. यामुळे दिवसा लाही लाही करणारे उन तर रात्री थंडी अशाने ताप, सर्दी, खोकला, अंगात कणकण अशा आजारांचा सामना करावा लागतोय..   
सोयाबीन सोंगणाऱ्या शेतकऱ्यांचे हाल..
दरम्यान जिल्ह्यात सध्या शेतकऱ्यांकडे सोयाबीन सोंगण्याचा हंगाम सुरू आहे. हे काम वेळेतच पूर्ण करावे लागत असल्याने सकाळी ५ वाजेपासून सोयाबीन सोंगण्याचे काम सुरू होते ते अगदी दिवस मावळतीला जाईपर्यंत चालते. भर उन्हात हे अतिशय मेहनतीने काम होत असल्याने मजुरांना देखील ताप, खोकल्याचे व अंगदुखीचे आजार होत आहेत. मात्र रात्री घरी गेल्यावर सलाईन घ्यायचे अन् दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजता पुन्हा कामावर हजर व्हायचे अशी पोटासाठी धडपड शेतकरी, शेतमजुरांची सुरू आहे.
 ऑक्टोबर हिटपासून बचाव करण्यासाठी भरपूर पाणी पिणे, फळांचा रस घेणे. सुती आणि हलक्या रंगाचे कपडे परिधान करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिल्या जातो. आजारांची लक्षणे दिसताच ताबडतोब आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.