भक्तिरसातून शेतकरी लढ्याला बळ; वरवंडच्या महिला भजनी मंडळाचा आंदोलनाला अनोखा पाठिंबा

 
बुलढाणा(बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा):शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्ती व हक्काच्या पीकविम्यासाठी सुरू असलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला समाजातील विविध स्तरांतून पाठिंबा मिळत असून, वरवंड (ता. जि. बुलढाणा) येथील महिला भजनी मंडळाने आंदोलनस्थळी भेट देत संघर्षाला भक्तिरसाची जोड दिली. विठ्ठल नामाच्या गजरात, पारंपरिक गवळणी आणि भक्तिगीतांच्या माध्यमातून महिला भगिनींनी आंदोलनाला नैतिक बळ देत शेतकरी लढ्याशी आपली एकजूट व्यक्त केली.
टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि अखंड विठ्ठल नामस्मरणात संपूर्ण आंदोलनस्थळ भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेले. शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेल्या महिला भगिनींनी “शेतकऱ्यांना न्याय मिळो, अन्नदात्याचा विजय होवो” अशी प्रार्थना करत आंदोलनकर्त्यांना संघर्षासाठी नवी ऊर्जा दिली.
यावेळी उपस्थितांनी शेतकरी हा देशाचा अन्नदाता असून त्याच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त केली. कर्जमुक्ती आणि पीकविम्याच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या या लढ्याला समाजातील प्रत्येक घटक जोडला जात असल्याचे प्रेरणादायी चित्र यानिमित्ताने पाहायला मिळाले.
वरवंड येथील महिला भजनी मंडळाच्या सर्व भगिनींनी दिलेल्या या अनोख्या पाठिंब्याबद्दल आंदोलनकर्त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या आशीर्वादामुळे आणि सहभागामुळे शेतकरी संघर्षाला नवे बळ व सकारात्मक ऊर्जा मिळाल्याची भावना आंदोलनस्थळी व्यक्त करण्यात आली.