बुलढाण्यात शेतकऱ्यांचे भगवे वादळ! उबाठा शिवसेनेच्या मोर्चाला सुरुवात; ‘हेक्टरी १ लाख रुपये मदत द्या, अन्यथा हातात बांगड्या भरा’; खा. अरविंद सावंत, आ. नितीन देशमुखांची तोफ धडाडणार!

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज, २९ सप्टेंबर रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चाला सुरुवात झाली असून, जिल्हाभरातून आलेल्या शिवसैनिकांनी टिळक नाट्य क्रीडा मंदिराच्या मैदानावर मोठी गर्दी केली आहे. ‘हेक्टरी १ लाख रुपये मदत द्या, अन्यथा हातात बांगड्या भरा’, अशा आक्रमक घोषणांनी आणि कलापथकांच्या सादरीकरणाने परिसर दणाणून गेला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष आर्थिक मदत जमा होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आला असून, या मोर्चाला खासदार अरविंद सावंत आणि उपनेते आमदार नितीन देशमुख संबोधित करणार आहेत.

टिळक नाट्य क्रीडा मंदिराच्या मैदानावर शिवसैनिकांची गर्दी!

मोर्चाच्या यशस्वी आयोजनासाठी ठाकरे शिवसेनेच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली होती. आज सकाळपासूनच जिल्ह्याच्या विविध भागांतून शिवसैनिक, शेतकरी, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते टिळक नाट्य क्रीडा मंदिराच्या मैदानावर एकत्र येऊ लागले. सध्या मैदानावर शिवसैनिकांची मोठी गर्दी जमली असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारविरोधात जोरदार वातावरण निर्माण झाले आहे.

संगम चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाचा मार्ग!

टिळक नाट्य क्रीडा मंदिराच्या मैदानावरून निघणारा हा मोर्चा संगम चौक, जयस्तंभ चौक, बाजार गल्ली आणि कारंजा चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आयोजित या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी आणि शिवसैनिक सहभागी झाले आहेत.

कलापथकांचे देखावे, बैलगाड्यांनी वेधले लक्ष!

मोर्चाच्या ठिकाणी उभारण्यात आलेले विविध देखावे आणि कलापथकांचे सादरीकरण लक्षवेधी ठरत आहे. ‘हेक्टरी १ लाख मदत द्या, अन्यथा हातात बांगड्या भरा’, अशा आशयाची गाणी सादर करून सरकारच्या धोरणांविरोधात निषेध व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, काही शेतकरी बैलगाड्या घेऊन मोर्चासाठी दाखल झाले आहेत. पारंपरिक बैलगाड्या, आक्रमक घोषणा आणि शेतकऱ्यांचा सहभाग यामुळे मोर्चाला वेगळे स्वरूप प्राप्त झाले आहे.

‘लबाडाचं आमंत्रण, जेवल्याशिवाय काही खरं नाही!’; जालिंदर बुधवतांचा सरकारवर हल्लाबोल

शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भात राज्य सरकारने जारी केलेल्या शासन निर्णयावर उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी यापूर्वीच तीव्र टीका केली आहे. सरकारचा जीआर म्हणजे ‘लबाडाचं आमंत्रण, जेवल्याशिवाय काही खरं नाही!’, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर निशाणा साधला होता. शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये किंवा एक लाख रुपये मदत देणार का, याबाबत शासन निर्णयात स्पष्टता नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. केवळ कागदावरील घोषणा नको, तर शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष मदत जमा झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

खा. अरविंद सावंत, आ. नितीन देशमुखांची तोफ धडाडणार!

या मोर्चाला ठाकरे शिवसेनेचे नेते खासदार अरविंद सावंत आणि उपनेते आमदार नितीन देशमुख संबोधित करणार आहेत. त्यामुळे मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला घेरण्याची तयारी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, जयश्री शेळके यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोर्चाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रयत्नशील आहेत.

शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा होईपर्यंत आंदोलन सुरूच!

शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत मिळणे गरजेचे असून, केवळ शासन निर्णय काढून प्रश्न सुटणार नाही, अशी भूमिका उबाठा शिवसेनेने घेतली आहे. २९ सप्टेंबरचा हा मोर्चा केवळ सुरुवात असून, शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. त्यामुळे आजचा मोर्चा जिल्ह्यातील शेतकरी आंदोलनाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार असून, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणाऱ्या या भगव्या मोर्चाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.