बुलढाण्यातील शेतकऱ्यांनो, १० नोव्हेंबरपूर्वी ई-पीक पाहणी पूर्ण करा! अन्यथा पीक विमा आणि सरकारी अनुदानाच्या लाभात अडचण; जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांचे आवाहन...

 
 बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खरीप हंगाम २०२६-२७ साठी बुलढाणा जिल्ह्यात केंद्रीय DCS MH (Central DCS) या नवीन मोबाईल ॲपद्वारे ई-पीक पाहणी व नोंदणी मोहिमेला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची नोंदणी १० नोव्हेंबर २०२६ पूर्वी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी केले आहे. पीक नोंदणी न केल्यास सातबारा उताऱ्यावरील पीक पेरा कोरा राहू शकतो आणि त्यामुळे पीक विमा, शासकीय अनुदान तसेच विविध योजनांच्या लाभांमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात.

महाराष्ट्र शासनाच्या जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख कार्यालयाच्या निर्देशानुसार ११ ऑगस्ट २०२६ पासून ई-पीक पाहणी व नोंदणी मोहिमेला सुरुवात झाली आहे. ही प्रक्रिया अधिक गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी प्रशासनाने प्रत्येक गावासाठी विशेष पीक पाहणी सहाय्यकाची नियुक्ती केली आहे.

खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जिल्ह्यात एकूण ८ लाख ४१ हजार १९६ मालकीच्या प्लॉटची पीक पाहणी करावयाची आहे. त्यापैकी आतापर्यंत ३ लाख ८९ हजार ६६५ प्लॉटवर संबंधित सहाय्यकांमार्फत सातबारा उताऱ्यावर पिकांची नोंदणी पूर्ण झाली आहे.उर्वरित प्लॉटची नोंदणी पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या गावातील नियुक्त पीक पाहणी सहाय्यकाशी संपर्क साधून ई-पीक पाहणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

 १०० टक्के ई-पीक पाहणी नोंदणी बंधनकारक

केंद्रीय DCS MH मोबाईल ॲपद्वारे थेट शेतावर जाऊन पिकांची पाहणी करणे, त्यांची नोंदणी करणे आणि संबंधित माहिती अपलोड करणे आवश्यक आहे. या मोहिमेंतर्गत १०० टक्के ई-पीक पाहणी नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे.खरीप हंगामात शेतात उभे असलेले पीक, तसेच कायम पड अथवा चालू पड असलेल्या जमिनींचीही नोंद करणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील प्रत्यक्ष परिस्थितीनुसार अचूक नोंदणी करून घ्यावी.

पीक विमा आणि सरकारी योजनांच्या लाभासाठी पीक नोंद महत्त्वाची

ई-पीक पाहणीद्वारे पिकांची नोंदणी न केल्यास सातबारा उताऱ्यावरील ‘पीक पेरा’ हा रकाना कोरा राहू शकतो. ही नोंद नंतर भरता येत नसल्याने शेतकऱ्यांना पीक विमा, शासकीय अनुदान आणि इतर विविध योजनांचे लाभ मिळवताना अडचणी येऊ शकतात.अवेळी पाऊस किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास पीक विम्याचा लाभ मिळवण्यासाठी सातबारा उताऱ्यावर पिकांची अचूक नोंद असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

 शेतकऱ्यांनी मुदतीपूर्वी नोंदणी पूर्ण करावी

जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी १० नोव्हेंबर २०२६ पूर्वी आपल्या गावातील नियुक्त पीक पाहणी सहाय्यकाकडून केंद्रीय DCS MH ॲपद्वारे पिकांची नोंदणी पूर्ण करून घ्यावी. पीक विमा, अनुदान आणि शासकीय योजनांच्या लाभांमध्ये अडचणी टाळण्यासाठी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी केले आहे.