हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी हतबल; नुकसानभरपाईची मागणी तीव्र; 
क्रांतीकारी शेतकरी संटघटनेचे निवेदन..! 

 
 चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : तालुक्यातील शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकटाचे नवे सावट आले असून, सोयाबीन पिकांवर हुमणी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. उगवलेली सोयाबीन पिके सुकू लागल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा खर्च परवडत नसल्याने सरकारने तातडीने मदतीसाठी पुढे यावे, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चिखली तालुक्यात सोयाबीन हे मुख्य पीक असून त्यावरच हजारो शेतकऱ्यांचे आर्थिक गणित अवलंबून आहे. मात्र सध्या हुमणी अळीच्या जोरदार हल्ल्यामुळे पिकांची पाने पिवळी पडत असून काही ठिकाणी संपूर्ण झाड सुकताना दिसत आहे. मुळांच्या भागात २-३ इंच खोलीवर अळ्या मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. महागड्या कीटकनाशकांची फवारणी करूनही अळी नियंत्रणात येत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान दिवसेंदिवस वाढत आहे.
यंदा उशिरा झालेल्या पावसामुळे आधीच दुबार पेरणीचा धोका निर्माण झाला होता. त्यात आता अळीच्या हल्ल्यामुळे खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने नुकसानग्रस्त भागात पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी. तसेच दुबार पेरणीसाठी लागणारी आर्थिक मदतही शासकीय पातळीवरून उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.निवेदनावर संघटनेचे नेते भगवानराव मोरे, राम अंभोरे, छोटू झगरे, कार्तिक खेडेकर, सुधाकर तायडे, चेतन शिंदे व आदित्य उन्हाळे आदींची स्वाक्षरी आहे.