बोगस साेयाबीन बियाण्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट; बियाणे कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा – भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांची मागणी

 
 मोताळा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना बोगस सोयाबीन बियाण्यामुळे दुबार पेरणी करावी लागली. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी कृषी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जाब विचारला. तसेच बाेगस बियाणे विकरणाऱ्या कंपन्यांवर फाैजदारी गुन्हे दाखल करण्याच्या मागणी केली. 

शेतकऱ्यांची आर्थिक लूट करणाऱ्या बोगस बियाणे कंपन्यांवर आणि नफेखोरीसाठी बोगस बियाणे विकणाऱ्या कृषी केंद्र चालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करणे आवश्यक आहे. यासोबतच दोषींना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई झाली पाहिजे, असे विजयराज शिंदे यांनी यावेळी सांगितले. 
पंचनाम्यांकडे कृषी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष 
शेतकऱ्यांनी बियाणे न उगवल्याबाबत तक्रारी केल्या असूनही कृषी अधिकाऱ्यांनी वेळेत पंचनामे केले नसल्याची तक्रार शिंदे यांनी अधिकाऱ्यांकडे केली. भाजप शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून दोषींवर कारवाई झाली नाही, तर आंदाेलन करण्याचा इशारा शिंदे यांनी यावेळी दिला. 
या चर्चासत्रात कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी देवेंद्र ढगे, भाजपा मोताळा तालुकाध्यक्ष सचिन शेळके, माजी तालुकाध्यक्ष गजानन घोंगडे, मोताळा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष सलीम चुनावाले, तसेच रिधोरा जहांगिर येथील तक्रारदार शेतकरी राजाराम सुरगडे व प्रकाश झंवर उपस्थित होते.