उदयनगरात शेतकऱ्यांचा संताप उफाळला! एसटी बस पेटविण्याचा प्रयत्न...व्हिडिओ व्हायरल! देऊळगावमहीत शेतकरी रस्त्यावर उतरले; कडकडीत बंद 

 
 बुलडाणा :(बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या १५ जूनपासून सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाने आता अतिशय उग्र रूप धारण केले आहे. राज्यात ठिकठिकाणी जाळपोळीसह उग्र आंदोलनाच्या घटना समोर येत आहेत. दरम्यान आज आंदोलनाच्या पाचव्या दिवशी रविकांत तुपकर यांची प्रकृती प्रचंड खालावली असताना उदयनगरात एसटी बस पेटविण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. देऊळगावमही येथे शेतकरी रस्त्यावर उतरले असून त्यांनी व्यापाऱ्यांना बंदचे आव्हान केले आहे. या बंदला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. 

प्राप्त माहितीनुसार उदयनगर येथे ही बस मुक्कामी होती. अज्ञात शेतकरी आंदोलकांनी चिखली खामगाव मार्गावर उभ्या बसच्या टायरवर ज्वलनशील पदार्थ टाकून टायर पेटविण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा पाचवा दिवस असूनही प्रशासनाकडून दखल घेतल्या जात नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तुपकर यांची तब्येत आता प्रचंड खालावत आहे, साखरेची पातळी सामान्य पातळीपेक्षा खूप कमी झाली असून शरीरात इन्फेक्शन वाढले आहे. तुपकर यांचे अन्न त्याग आंदोलन काही तास असेच सुरू राहिल्यास तुपकर यांच्या तब्येतीला गंभीर धोका उद्भवू शकतो अशी शक्यता वैद्यकीय तज्ञांनी बोलून दाखवली आहे. या पार्श्वभूमीवर तुपकर यांचे आंदोलन शेतकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनाने आणखी तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.