पेनटाकळी प्रकल्पाच्या पाण्यासाठी शेतकरी आक्रमक!; कॅनॉलवरच सुरू केले बेमुदत उपोषण

 
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पेनटाकळी प्रकल्पाच्या पाण्यासाठी मेहकर तालुक्‍यातील घाटनांद्रा, उटी, देळप, बोथा, गोमेधर, लोणी काळे, निंबा, बारडा, पारडी, घुटी येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. ४ जानेवारीला त्‍यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. मात्र निवेदनाची दखल न घेण्यात आल्याने ते घाटनांद्रा कॅनॉलजवळच आज, ११ जानेवारीपासून उपोषणाला बसले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांनी म्‍हटले आहे, की यावर्षीय पाऊस चांगला झाल्यामुळे पेनटाकळी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. मात्र तरीही मेहकरचा सिंचन विभाग आणि पाणी महासंघाने हेतूपुरस्सर केवळ कोपर बंधाऱ्यावर सिंचन करण्याचा घाट घातला आहे. कालव्यावरील लाभधारक शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत. प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी मिळावे, असेही निवेदनात म्‍हटले आहे. उपोषण आंदोलनात रवींद्र देशमुख, विष्णूदास राठोड, संजय सुळकर, श्याम देशमुख, पंडित धोटे, संजय राठोड, भास्‍कर जाधव, श्यामराव आंधळे, राजेश आखूड, बाजीराव काळे यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले आहेत. दुपारी वृत्त लिहीपर्यंत कुणाही अधिकाऱ्याने आंदोलनाची दखल घेतलेली नव्हती.