शेतकऱ्यांनो! ‘ॲग्रिस्टॅक’ बंधनकारकच; शासनाच्या याेजनांच्या लाभाला लागणार ‘ब्रेक’...जिल्हा कृषी अधिकारी म्हणाले.....

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्य सरकारने २५ जून रोजी जाहीर केलेल्या निर्णयानुसार शेतीपिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांची ‘ॲग्रिस्टॅक’ योजनेतील नोंद आवश्यक ठरणार आहे. पंचनामे पारंपरिक पद्धतीने किंवा ई-पद्धतीने काढले गेले तरी त्यात ‘शेतकरी ओळख क्रमांक’ नमूद करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनाेजकुमार ढगे यांनी केले आहे. 
फार्मर आयडीमुळे नुकसानभरपाईसाठी थेट बँक खात्यात पैसे जमा करणारी प्रणाली अधिक कार्यक्षम होणार आहे. यापुढे मदतीचा लाभ केवळ ॲग्रिस्टॅक नोंदणीकृत शेतकऱ्यांनाच दिला जाईल. परिणामी, मदत वाटपात होणाऱ्या त्रुटी, दुबार नोंदी किंवा बनावट दावे टाळता येणार आहेत. सर्व शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार करण्यासाठी प्रशासकीय व कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. शासनाने ‘शाश्वत धोरणा’अंतर्गत शेतकऱ्यांसाठी ॲग्रिस्टॅक प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. त्यात शेतकऱ्यांची जमीन, पीक, सिंचन व आर्थिक स्थिती यासंबंधी सर्व माहिती एकत्रित ठेवली जाते. 
शेतकऱ्यांना केवळ नुकसानभरपाईच नव्हे, तर शासनाच्या सर्व योजना आणि उपक्रमांमध्ये ‘फार्मर आयडी’ला विशेष महत्त्व राहणार आहे. हीच शेतकऱ्यांची अधिकृत ओळख ठरणार असल्याने, ज्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांनी तातडीने व काळजीपूर्वक नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ढगे यांनी केले आहे.