मोबाईलवर ‘एक्स्ट्रीम अलर्ट’चा सायरन! तुमचा मोबाईलही आज जोरजोरात वाजू शकतो; पण घाबरू नका! देशभरात आपत्कालीन सूचना प्रणालीची चाचणी..नेमकं काय ते वाचा.. 

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): होय..आज,२ में रोजी अनेकांची मोबाईल एकाच वेळी खूप जोरात आवाज करतील..धोकादायक सायरन सारखा हा आवाज ऐकून कुणीही बुचकळ्यात पडेल.. पण काळजी करू नका.. तुमच्या भविष्यातील सुरक्षेसाठी सरकार एक चाचणी करत आहे..ते नेमकं काय समजून घ्या..

देशभरातील नागरिकांच्या मोबाईलवर अचानक मोठ्या आवाजात “Extremely Severe Alert” असा संदेश झळकून अनेकांमध्ये क्षणभर भीतीचे वातावरण निर्माण झाले.. मात्र, ही कोणतीही आपत्ती नसून केंद्र सरकारकडून नव्याने विकसित करण्यात आलेल्या आपत्कालीन सूचना प्रणालीची (Cell Broadcast Alert System) व्यापक चाचणी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

ही प्रणाली देशभरात कार्यान्वित करण्यापूर्वी तिची कार्यक्षमता, संदेश पोहोचण्याचा वेग आणि तांत्रिक त्रुटी तपासण्यासाठी ही चाचणी घेण्यात आली. चाचणी यशस्वी झाल्यानंतर ही प्रणाली संपूर्ण देशात लागू होणार असून विविध भारतीय भाषांमध्ये नागरिकांना आपत्कालीन सूचना मिळणे अधिक सोपे होणार आहे.

आपत्तीच्या वेळी ठरणार ‘जीवनदायी’ प्रणाली....

भविष्यात मोठ्या नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींच्या वेळी नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी ही प्रणाली अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. भूकंप, पूर, त्सुनामी, चक्रीवादळ अशा नैसर्गिक आपत्तींबरोबरच वीज पडणे, अतिवृष्टी यांसारखे हवामान इशारे आणि गॅस गळती, रासायनिक दुर्घटना यांसारख्या मानवनिर्मित धोक्यांबाबतही त्वरित सूचना दिल्या जाणार आहेत. 

अलर्टची वैशिष्ट्ये काय?

मोठा सायरनसारखा आवाज: मोबाईल सायलेंटवर असला तरीही विशेष ध्वनीसह अलर्ट मिळतो.
फ्लॅश संदेश: स्क्रीनवर थेट सूचना दिसते आणि ती वाचल्याशिवाय हटत नाही.
इंटरनेटची गरज नाही: सेल टॉवरद्वारे संदेश थेट पाठवले जातात.

ही प्रणाली पारंपरिक SMS पेक्षा वेगवान असून विशिष्ट क्षेत्रातील सर्व मोबाईल वापरकर्त्यांना एकाच वेळी सूचना पोहोचवू शकते. 

नागरिकांनी घाबरू नये: सरकारचे आवाहन...

सरकारने स्पष्ट केले आहे की, सध्या पाठवण्यात आलेले संदेश हे केवळ चाचणी स्वरूपातील असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. कोणतीही कृती करण्याची आवश्यकता नसून ही देशाच्या आपत्कालीन तयारीचा एक भाग आहे.