EXCLUSIVE झेडपीच्या नव्या "एचओडी" ची कर्मचाऱ्यांना नवी ऑफर! महिन्याला १००० ऐवजी एकदाच वर्षाचे १० हजार द्या...बुलडाणा झेडपीत " २ हजारांच्या कन्सेशन" ची तुफान चर्चा! 

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): होय...ही अगदी पक्की बातमी आहे. बुलडाणा जिल्हा परिषदेच्या एका "नव्या" एचओडीने आपल्या विभागात अधिनस्त कर्मचाऱ्यांसाठी एक भन्नाट ऑफर सुरू केली आहे. जुन्या "एचओडी" च्या काळात महिन्याला १००० अशी पद्धत होती. त्यावर त्यावेळी "बुलडाणा लाइव्ह" ने सडेतोड वृत्त प्रसिद्ध केले होते. मात्र ही पद्धत बदलून नव्या एचओडीने एकदाच दहा हजार द्या आणि २ हजारांची सूट मिळवा अशी ऑफर सुरू केली आहे.पुढच्या दोन चार महिन्यांत जिल्हा परिषदांच्या निवडणुका लागण्याची संभाव्यता लक्षात घेता ही ऑफर सुरू झाल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात आहे.

 विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अलीकडच्या काळात जिल्हा परिषदेच्या एका महत्वाच्या विभागाच्या "एचओडी"ने बिचाऱ्या कर्मचाऱ्यांची व्यथा आणि दुःख समजून घेत नवी ऑफर सुरू केली. आधीच्या एचओडीच्या काळात महिन्याला १००० रुपये कर्मचारी देत होते. मात्र यामुळे जनतेच्या आरोग्याची काळजी(?) घेणाऱ्या बिचाऱ्या कर्मचाऱ्यांना वर्षाला १२ हजार रुपयांचा भुर्दंड पडत असल्याची बाब संवेदनशील मनाच्या एचओडींच्या ध्यानात आली.

आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या खिशाला बसणारी झळ एचओडींना अस्वस्थ करत होती..ही बाब संवेदनशील मनाच्या एचओडींना झोपू देत नव्हती, जेवणही त्यांना गोड लागत नव्हते..कर्मचाऱ्यांना बसणारी झळ कशी कमी करता येईल यावर त्यांनी काम करायला सुरुवात केली..अखेर त्यांना मार्ग सापडला, आणि महिन्याला १००० देण्याऐवजी वर्षांचे एकदाच दहा हजार देऊन तब्बल २ हजार रुपयांची सूट मिळवा अशी कल्पक योजना एचओडी साहेबांनी सुरू केली..लवकरच या एचओडींचा कर्मचाऱ्यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात येणार असल्याची बातमी आहे..